Mahabaleshwar Politics : नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार (ता.21) शेवटचा दिवस होता. त्यादिवशी महाबळेश्वरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. मंत्री मकरंट पाटलांनी नगराध्यक्षपदासाठी झालेली बंडखोरी मोडून काढली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चुलत बहीण, माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विमल ओंबळे या प्रभाग चारमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगराध्यक्षपदासाठी नऊ अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादीचे नासीर मुलाणी यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. मात्र, मकरंद पाटील यांनी मुलाणी यांची भेट घेत समजूत काढली. त्यानंतर मुलाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील निवडणुकीच्या मैदानात उतरेल अशी हवा होती. मात्र, शिवसेनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. शिवसेनेकडून लढण्यास असेलेल्या बहुतेक संभाव्य उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तर, भाजपची स्थिती देखील नाजूक आहे. कमळ चिन्हावर लढणारे फक्त तीन उमेदवार आहेत.
एकनाथ शिंदेंची बहीण विमल ओंबळे या माजी नगरसेविका आहेत. त्या पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे निश्चत होते. एकनाथ शिंदे हे काही दिवसांपूर्वी साताऱ्यात आले होते. त्यांनी मेळावा देखील घेतला होता. त्यांनी विमल ओंबळे यांची जबाबदारी कुमार शिंदे यांच्यावर सोपवली होती. मात्र, ऐनवेळी कुमार शिंदेंनी विमल यांच्या विरोधात लढणाऱ्या विमल बिरामणे यांना पाठींबा दिला. विमल ओंबळे यांनी ही बाब एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचवली मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी शिवसेनेची साथ सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीकडून सुनील शिंदे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कुमार शिंदे, सतीश साळुंखे, संजय पाटील लोकमित्र जनसेवा आघाडीचे डी एम बावळेकर आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी बहुरंगी लढत होणार आहे. दरम्यान, महाबळेश्वर नगपालिकेतील 20 जागांसाठी 83 उमेदवारी अर्ज आले होते. मात्र, शेवटच्या दिवशी 22 जणांनी माघार घेतल्याने 63 उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.