Solapur, 25 November : सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये भाजपने स्वबळावर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. महायुतीमधील शिवसेनेने सांगोला, मोहोळ, अक्कलकोट, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी आपले उमेदवार मैदानात उतरविले आहेत. या ठिकाणी त्यांची थेट लढत भाजपशी होत असून जोरदार टक्कर देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपला टशन देण्याच्या तयारीत आहे.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीसाठी भाजपने स्वबळाची घोषणा केली होती. भाजपने सर्व ठिकाणी नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. मात्र, हे करताना भाजपने साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब केला आहे. त्यातून महायुतीमधील मित्रपक्ष असलेला शिवसेना रक्ताबंबाळ झाली आहे. त्यामुळे चावतळलेली शिवसेना भाजपवर जोरदार पलटवार करताना दिसत आहे.
सांगोल्यात शेकाप आणि भाजपची युती अनेकांना आवडलेली नाही. मात्र, या युतीमुळे शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार शहाजी पाटील हे प्रचंड संतापले आहेत. त्यांनी आपल्या नेहमीच स्टाईलमध्ये भाजपला विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरेंना अंगावर घेतले आहे. शेकापबरोबरच सर्वसामान्यांमधून या युतीबाबत नकारात्मक प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत. त्यातच शहाजीबापूंनी भावनिक वातावरण बनविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सांगोल्यात भाजपला धक्का बसल्यास नवल वाटू नये.
मोहोळमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस मदतीने शिवसेनेने भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. या ठिकाणी नगराध्यक्षांसह नगरसेवकपदाचे अनेक उमेदवार हे राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहेत. माजी आमदार राजन पाटील यांच्याबाबत निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणाचा फटका मोहोळमधील भाजप उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेने मोहोळमधील वातावरणात फरक पडल्याची चर्चाही शहरात सुरू आहे.
करमाळ्यात तर गेली २७ वर्षांपासून नगरपालिकेवर सत्ता राखून असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. माजी आमदार जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांची मदत मिळणार आहे, त्यामुळे करमाळ्यातही धनुष्यबाणाचे पारडे जड आहे. याठिकाणी भाजपकडून माजी नगरसेवक कन्हैयालाल देवी यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. पण त्यामुळे दुसरे मातब्बर इच्छूक रश्मी बागल यांच्या मावशीला डावलण्यात आले आहे. विलास घुमरे यांच्या पत्नीला डावलून भाजपने देवीला उमेदवारी दिल्याने बागल आणि घुमरे परिवार नाही म्हटले तरी नाराज झाला आहे.
अक्कलकोट आणि दुधनीमध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये काडीचेही जमत नसले तरी ‘सेटलमेंट’ची राजकारणाची जोरदार चर्चा तालुक्यात आहे. दुधनी नगरपरिषदेवर शिवसेनेच्या माध्यमातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे पुन्हा वर्चस्व मिळविण्याच्या तयारीत आहेत. तसेच, अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी हे पुन्हा भाजपचा झेंडा फडकविण्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात सोलापूरचे मैदान मारले आहे. अक्कलोटमध्ये सभा घेऊन त्यांनी मित्रपक्षाच्या आमदाराला इशारा दिला आहे. तसेच मोहोळ आणि सांगोल्यातील शिंदेंची सभा प्रचंड आक्रमक झाल्या आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेंचा सोलापूर दौरा शिवसेनेसाठी आणि निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांना बूस्टर डोस मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.