Ekanth Shinde, Manoj Ghorpade, Devendra Fadnavis, Darishsheel Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti News : शिंदेसेनेनं वाढवलं भाजपचं टेन्शन, कराड 'उत्तर' मतदारसंघावर केला दावा

Umesh Bambare-Patil

Karad News, 11 Oct : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कराड उत्तर मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या विरोधात महायुतीतील कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कराड (Karad) उत्तर मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटानेही कराड उत्तर हा शिवसेनेचा मतदारसंघ असून, तेथील उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.

जाहीर मेळाव्यात शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी उमेदवारीची मागणी करून खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत त्यासाठी मेळावा घेणार असल्याचे जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपमधून (BJP) निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. कराड उत्तर मतदारसंघात (Karad North Vidhan Sabha election) सातारा, खटाव, कोरेगाव आणि कराड तालुक्यांतील गावांचा समावेश होतो.

त्यामुळे या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र हे चार तालुक्यांचे आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून आज अखेर त्याच पक्षाचे वर्चस्व आहे. या मतदारसंघाचे सध्याचे आमदार बाळासाहेब पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील कदम, तर अपक्ष म्हणून मनोज घोरपडे यांनी निवडणूक लढवली होती.

कदम आणि घोरपडे यांच्या मतांची विभागणी आमदार पाटील यांच्या पथ्यावर पडली आणि ते विजयी झाले. तेव्हापासून आजपर्यंत भाजपकडून त्या मतदारसंघात वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पक्षाच्या माध्यमातून भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, युवा नेते मनोज घोरपडे, भाजपच्या किसान मोर्चाचे उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी सरकारमधील मंत्र्यांकडून निधी आणून गावोगावी भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्याने पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे पक्षांतर्गत दोन गट तयार झाले. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे शरद पवारांबरोबर राहिले आहेत. अजित पवार हे भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारमध्ये आल्याने त्यांची ताकद भाजपच्या पथ्यावर पडेल या आशेने कराड उत्तरमधील भाजपचे नेते चार्ज झाले आहेत.

मात्र, भाजपने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्याचे आहेत. पाटण आणि कोरेगाव तालुक्यात शिवसेनेचा आमदार आहे. पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणार असून, त्यांच्या विचाराचा आमदार कराड उत्तरमधील असेल, तर मतदारसंघाचा चांगला कायापालट करता येईल.

परंपरेनुसार कराड उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. डॉ. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत लवकरच मेळावा घेणार असून मित्रपक्षाने कराड उत्तरच्या जागेसाठी अट्टहास करू नये, असा पवित्रा घेतला आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी कराड उत्तरमध्ये भाजपच्या कमळाचाच उमेदवार असेल, असे जाहीर सभेत सांगितले आहे.

त्यातच य मतदारसंघात भाजपमधून निवडणुकीसाठी धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ यांनी तयारी केली आहे. निवडणूक तोंडावर आली असतानाच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कराड उत्तर हा शिवसेनेचा मतदारसंघ असल्याचे सांगत उमेदवारीवर दावा केल्यामुळे भाजपमधून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT