Prashant Sale -Dhawalsingh Mohite Patil
Prashant Sale -Dhawalsingh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress : धवलसिंह मोहिते पाटलांनी जपला आजोबांच्या दोस्तीचा वसा; मंगळवेढा काँग्रेसची धुरा सोपवली कट्टर समर्थकाकडे

सरकारनामा ब्यूरो

गुरुदेव स्वामी

भोसे (जि. सोलापूर) : मंगळवेढा (Mangalveda) तालुका काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदी हुन्नूर येथील प्रशांत साळे (Prashant Sale) यांची निवड करण्यात आली आहे. साळे यांच्या निवडीने मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातून काँग्रेसला आता बळ मिळणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील (Dhawalsingh Mohite Patil) यांनी प्रशांत साळे यांच्यावर मंगळवेढा तालुका काँग्रेस पक्षाची मुख्य जबाबदारी देऊन त्यांचे आजोबा सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि प्रशांत साळे यांचे आजोबा दलित मित्र बाबासाहेब साळे यांच्यात असलेला दोस्ताना निभावला आहे. (Election of Prashant Sale as President of Mangalveda Taluka Congress)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपर्यंत मंगळवेढा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागावर काँग्रेसचे वर्चस्व होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला. मात्र (स्व.) आमदार भारत भालके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे भालकेच्या रूपाने आला होता. या मतदारसंघात यापूर्वी दलितमित्र दिवंगत बाबासाहेब साळे यांनी जिल्हा परिषदेवर समाज कल्याण सभापती म्हणून काम केले आहे. ते (स्व.) शंकरराव मोहिते पाटील यांचे समर्थक मानले जात होते. त्यानंतर बाबासाहेब साळे यांच्या स्नूषा व नूतन अध्यक्ष प्रशांत साळे यांच्या मातोश्री सुशीला साळे यांनीही जिल्हा परिषदेत समाज कल्याण समितीच्या सभापती म्हणून काम केले आहे.

(स्व.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून त्यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षाची बांधणी करताना पुन्हा आपल्याच जुन्या समर्थकांना ते सामावून घेत आहेत. आश्रम शाळेच्या रूपाने साळे परिवाराने तालुक्याच्या दक्षिण दुष्काळी भागात मोठे शैक्षणिक परिवर्तन केले आहे. त्याचबरोबर समाज कल्याण विभागाच्या विविध योजना व अन्य कामांच्या माध्यमातून बाबासाहेब साळे व त्यांच्या स्नूषा सुशीला साळे यांनी भोसे जिल्हा परिषद गट हा अग्रस्थानी ठेवला. गतवर्षीच्या निवडणुकीत हा गट विखुरला गेला तरी मतदाराची बांधिलकी मात्र मतदारांशी संपर्क ठेवणाऱ्या नेत्याशी राहिली आहे.

पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही भोसे भागातील बहुतांश गावे ही भगिरथ भालके यांच्या पाठीशी राहिली होती. काँग्रेसवर निष्ठा ठेवणाऱ्या जवळीक साधलेल्या मतदाराकडे मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी व त्यांच्या प्रश्नाकडे फारसे लक्ष दिले नाही. काँग्रेसने मागील काही वर्षांपूर्वी उज्ज्वलाताई शिंदे यांच्या निंबोणीतील आयोजित काँग्रेस मेळाव्यात नंदेश्वर येथील तत्कालिन काँग्रेस समर्थक (स्व.) बाळासाहेब बंडगर यांनी या दक्षिण दुष्काळी भागातून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान होते. जसं जसं नदीकाठचा भाग येईल, तसं तसं मतदान कमी होते. इकडल्या मताच्या जोरावर तालुक्यातील नेत्यांनी आपले राजकीय बस्थान बसविले, असा आरोप त्यावेळी केला होता.

त्यानंतरच्या काळात देखील काँग्रेसने भोसे भागाकडे फारसे लक्ष दिले नाही. (स्व.) आमदार कि. रा. मर्दा हे आपल्या भाषणात भोसे जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, असे सांगायचे. याच दक्षिण दुष्काळी पट्ट्यात हुन्नूर येथील प्रशांत साळे यांसारख्या युवा कार्यकर्त्याला पुन्हा एकदा काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने या भागातील प्रश्नाला न्याय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साळे हे उच्च शिक्षित आहेत. वरिष्ठ राजकीय पातळीवर त्यांचे चांगले संबंध आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व दीड वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. आगामी काळात तालुक्यात काँग्रेसमध्ये युवकाची मोठी फळी निर्माण करण्याची जबाबदारी प्रशांत साळे यांच्यावर पक्षनेतृत्वाने टाकली आहे.

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि बाबासाहेब साळे यांच्यापासून मोहिते पाटील व साळे घराण्याचे अगदी घनिष्ठ संबंध आहेत. त्यातच आता मोहिते पाटील यांच्या तिसऱ्या पिढीतील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह यांनी साळे घराण्यातील तिसऱ्या पिढीतील प्रशांत साळे यांना तालुकाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी देत आजोबांच्या मैत्रीची परंपरा पुढे चालू ठेवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT