Political party
Political party Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नवीन वर्षात साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुरळा

​ मुरलीधर कराळे

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याने देशाला सहकारी साखर कारखानदारी शिकविली. अहमदनगर जिल्हा जसा ऊस पीक व साखर उत्पादनासाठी ओळखला जातो. तसा तो साखर सम्राटांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुका पुढील वर्षी आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यात राजकीय हलचालींना वेग आला आहे. Election of sugar factories in the new year

कोरोनामुळे गेली दोन वर्षे राजकीयदृष्ट्या काहीसा शांत असलेला अहमदनगर जिल्हा पुढील वर्षभरात ढवळून निघणार आहे. जिल्ह्यातील तब्बल नऊ साखर कारखान्यांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. तीन कारखान्यांच्या निवडणुकांची प्रारूप यादी अंतिम टप्प्यात असून, या तीन कारखान्यांची निवडणूक जानेवारीच्या मध्यावर किंवा अखेरीस होईल. उर्वरित सहा कारखान्यांच्या निवडणुका वर्षभरात होणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुका विधानसभेच्या तोडीच्या असतात. कारखान्यावर आपले वर्चस्व राहण्यासाठी बहुतेक नेते प्रयत्न करतात. कारण ते विधानसभेचे प्रवेशद्वार मानले जाते. बहुतेक आमदार- खासदारांच्या हाती कारखान्यांची सत्ता असते. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात हे राजकीय गणित आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राजकीय क्षेत्रात काहीशी शांतता होती. सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. बहुतेक ग्रामपंचायतींच्याही निवडणुका स्थगित आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी मरगळ आली होती. असे असले, तरीही पुढील निवडणुकांच्या उमेदवारीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कोरोना संकटात शक्य ती मदत आपल्या मतदारसंघात केली. साखर कारखान्यांच्या विद्यमान संचालकांनीही कोरोना काळात आपल्या मतदारांना मदत देण्याचा अटोकाट प्रयत्न केला.

पुढील वर्षी जानेवारीच्या मध्यावर किंवा अखेरीस जिल्ह्यातील नाशिक विभागातील चार कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातील तीन कारखाने नगर जिल्ह्यातील आहेत. त्यांची प्रारूप यादी अंतिम टप्प्यात आहे. प्रत्यक्ष मतदार व सभासद संस्था, असे दोन प्रकारचे मतदार आहेत. संस्थांचे ठराव मागविणे सुरू आहे. येत्या २१ तारखेपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. नोव्हेंबरमध्ये यादी अंतिम होऊन जानेवारीत निवडणुका होतील. उर्वरित सहा कारखान्यांच्या निवडणुका वर्षभरात होतील.

- मिलिंद भालेराव, प्रादेशिक सहसंचालक (साखर)

जानेवारीत होणाऱ्या निवडणुका

- कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना, पिंपळगाव पिसे (ता. श्रीगोंदे)

- अशोक सहकारी साखर कारखाना, अशोकनगर (ता. श्रीरामपूर)

- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदे

वर्षभरात होणार निवडणुका

- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, कोळपेवाडी (ता. कोपरगाव)

- सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, सहजानंदनगर (ता. कोपरगाव)

- अगस्ती सहकारी साखर कारखाना, अगस्तीनगर (ता. अकोले)

- श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, बोधेगाव (ता. शेवगाव)

- श्री गणेश सहकारी साखर कारखाना, गणेशनगर (ता. राहाता)

- डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना, शिवाजीनगर (ता. राहुरी)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT