Prashant Paricharak, Dilip Mane, Mahesh Kothe, Rajan Patil, Umesh Patil
Prashant Paricharak, Dilip Mane, Mahesh Kothe, Rajan Patil, Umesh Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

निवडणूक नसली तरी सोलापूरात तापणार विधान परिषदेचे राजकारण!

प्रमोद बोडके - सरकारनामा ब्युरो

सोलापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Legislative Council elections) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. मुंबईतील (mumbai) दोन, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर या ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये सोलापूर विधान परिषदेची निवडणूकही होणार होती. मात्र, मतदार संख्या पूर्ण नसल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. ती निवडणूक आता मे-जून २०२२ मध्ये होण्याची शक्ता वर्तवली जात आहे. सोलापूरात मात्र, आता पासुनच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक पुढे गेल्याने उमेदवारांचा काही प्रमाणात तर मतदारांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला आहे. विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडल्या जाणाऱ्या १० सदस्यांची मुदत 7 जुलै 2022 रोजी संपत आहे. सोलापूरची निवडणूक आणि विधानसभा सदस्यांमधून निवडल्या जाणाऱ्या दहा जागांची निवडणूक एकाच वेळी होण्याची शक्‍यता आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील इच्छुकांना मे-जूनमध्ये आमदारकीचा मौका आता दिसू लागला आहे.

विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदार संघातील तगडे स्पर्धक म्हणून अनेक महिन्यांपासून आमदार प्रशांत परिचारक आणि माजी आमदार दिलीप माने या दोनच नावांची अधिक चर्चा राहिली आहे. सोलापूरची निवडणूक पुढे गेली की पुढे ढकलली? हा संशोधनाचा विषय आहे. ही निवडणूक लांबणीवर पडल्याने तूर्तास तरी महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीनंतर पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्याची पूर्ण तयारी भाजपने केली होती. जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती सभापती निवडी, नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकानंतरच सोलापूरच्या विधान परिषदेची निवडणूक होणार हे आता जवळपास निश्‍चित झाले आहे.

आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार दिलीप माने यांच्यात या जागेसाठी सामना होऊ शकतो. विधानसभा सदस्यांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषद सदस्यांच्या निवडणुकीत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी महापौर महेश कोठे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील या पैकी कोणाला राष्ट्रवादीच्या कोठ्यातून संधी मिळणार या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मोहोळ मतदार संघ राखीव झाल्यानंतरही सलग तीन वेळा राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणण्यात माजी आमदार राजन पाटील यांचा मोठा वाटा आहे. विधानपरिषदेवर घेण्याबाबतचा त्यांचा क्‍लेमही जुना आहे.

दरम्यानच्या काळात सोलापूर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. सोलापूरचा महापौर राष्ट्रवादीचा झाल्यास या कामगिरीची बक्षिसी म्हणून व 2024 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून माजी महापौर कोठे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. भाजपने आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांना महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात लढण्यासाठी मैदानात उतरविले आहे. त्याच धर्तीवर भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या नावाचा विधान परिषदेसाठी विचार होऊ शकतो. वक्तृत्व शैली, संघटन कौशल्य आणि राज्यभर असलेला संपर्क यामुळे उमेश पाटील यांचा उपयोग राष्ट्रवादीला राज्यभर यानिमित्ताने होणार आहे. उमेश पाटील यांचे उपयोग मुल्य अधिक असल्याने त्यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो.

या दहा जागा होणार रिक्त

भाजपचे आमदार रामनिवास सिंह, प्रसाद लाड, विनायक मेटे, प्रवीण दरेकर, सुजितसिंह ठाकूर व सदाभाऊ खोत, शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते व सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर व संजय दौंड या दहा जणांच्या सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2022 रोजी पूर्ण होत आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष

सोलापूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदार संघातील आमदारकीशिवाय सोलापूर जिल्ह्याला कॉंग्रेसच्या माध्यमातून विधानपरिषदेवर संधी मिळाली. तशी भरभरुन संधी भाजपनेही सोलापूर जिल्ह्याला दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र विजयसिंह मोहिते-पाटील यांना दिलेल्या दीड वर्षाच्या आमदारकी शिवाय जिल्ह्यातील एकाही नेत्याला विधान परिषदेवर संधी दिली नाही. शिवसेनेच्या माध्यमातूनही सोलापूर जिल्ह्याला एकदाही विधान परिषदेची संधी मिळाली नाही. कॉंग्रेस आणि भाजपने जिल्ह्यातील नेतृत्वाला विधान परिषदेत संधी दिली. तशी संधी देताना राष्ट्रवादी आणि शिवसेना मात्र का आखडता हात घेत असल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT