Ramesh Baraskar
Ramesh Baraskar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणासाठी पंढरपुरातून एल्गार संघर्ष यात्रा; मुंबईत १७ मे रोजी आंदोलन

भारत नागणे

पंढरपूर : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना तात्काळ करावी, घटनेतील ३४० व्या कलमाची अंमलबजावणी करावी, भटक्या विमुक्त जमातींना आदिवासी प्रवाहात समाविष्ट करावे, आरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक त्वरित पूर्ण करावे, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी येत्या १७ मे रोजी मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर ओबीसी आरक्षण (OBC reservation) बचाव एल्गार आंदोलन केले जाणार आहे. एल्गार संघर्ष यात्रेची सुरुवात २६ एप्रिल रोजी पंढरपुरातून होणार आहे, अशी माहिती ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रमेश बारसकर यांनी आज (ता. १५ एप्रिल) येथे पत्रकार परिषदेत दिली. (Elgar Sangharsh Yatra from Pandharpur for OBC reservation; Movement in Mumbai on 17th May)

आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्योती क्रांती परिषदेची आज येथील शासकीय निवास्थानावर जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बारसकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेत ओबीसी समाजासाठी ३४० कलमामध्ये आरक्षणाची तरतूद केली आहे. पण, स्वातंत्र्यानंतर या कलमाची अंमलबजावणी झालेली नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. पुढे शैक्षणिक व नोकरीतील जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

आरक्षण मिळवण्यासाठी आता नेत्यांच्या मागे न जाता, जनतेला सोबत घेऊन आरक्षणाची लढाई लढावी लागणार आहे. राजकारणात डोक्यांना नाही तर संख्येला किंमत आहे, त्यामुळे ओबीसी समाजाला सोबत घेऊन आरक्षणाचा लढ्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचेही बारसकर यांनी जाहीर केले. देशात जनावरांची जनगणना केली जाते; परंतु बहुसंख्य असलेल्या ओबीसींची जनगणना होत नाही. कोट्यवधी रुपयांचा खर्च एकतर्फी केला जात आहे. आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजातील सुमारे ८६ हजार लोकप्रतिनिधी वंचित राहणार आहेत.

येत्या २६ एप्रिलपासून ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने संघर्ष यात्रेला पंढरपुरातून सुरुवात केली जाणार असल्याचेही बारसकर यांनी सांगितले. या वेळी ज्योती क्रांती परिषदेचे तालुका अध्यक्ष शुक्राचार्य गवळी, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बिराप्पा मोटे, अरुण तोडकर, प्रवक्ते शिलवंत क्षीरसागर आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होेते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT