Solapur, 27 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ९ जागांसाठी गुरुवारी (ता. २६ नोव्हेंबर) ८६.९४ टक्के मतदान झाले. बॅंकेची मतमोजणी सुरू झाली असून मतमोजणीच्या पद्धतीवरूनही वाद निर्माण झाला होता. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे यानिमित्ताने पुन्हा समोरासमोर आले हेाते.
मात्र, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने पालकमंत्री गोरे यांच्या बाजूने कौल देत डीसीसीची मतमोजणी तालुकानिहाय करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.‘क्रॉस व्होटिंग’ टाळण्यासाठी पालकमंत्र्यांनी ही खेळी केल्याचे मानले जात आहे. या माध्यमातून निकालाआधीच पालकमंत्री गोरे यांनी मोहिते पाटील यांना धोबीपछाड दिल्याचे मानले जात आहे.
सोलापूर जिल्हा बॅंकेच्या २ हजार ५९६ मतदारांपैकी २ हजार २५७ मतदारांनी गुरुवारी मतदानाचा हक्क बजाविला आहे. मात्र, मतमोजणीच्या पद्धतीवरून मोहिते पाटील आणि पालकमंत्री गोरे हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्ह्याची एकत्रित मतमोजणी करण्याची मागणी केली होती, तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तालुकानिहाय मोजणी करण्याची मागणी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे केली होती. यामध्ये दोघांचीही राजकीय रणनीती होती.
क्रॉस व्होटिंग कळू नये, प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे मतदान करता यावे, यासाठी मोहिते पाटील यांनी एकत्रित मतमोजणीचा डाव टाकला होता. मात्र, क्रॉस व्हाेटिंग टळावे. धोका होऊ नये, यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तालुकानिहाय मतमोजणीची मागणी केली होती.
नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा बँकेत तालुकानिहाय, तर लातूर जिल्हा बँकेत जिल्ह्याची एकत्रित मतमोजणी करण्यात आली होती. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्ह्याची एकत्रित मोजणी करण्याची मागणी केली होती. तालुकानिहाय मोजणी करण्याची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली होती.
सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ मध्ये मतदान केंद्रनिहाय मतमोजणी करण्याची तरतूद आहे. लातूरच्या निवडणुकीत उपजिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्या ठिकाणी वेगळा नियम लावून केलेल्या मतमोजणी प्रक्रियेबद्दल राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आता तेथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विचारणा सुरू केल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.