Kolhapur News : शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून आता अर्ज भण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळच्या राजकारणात राजकीय भूकंप करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यांनी नुकताच काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांना जोरदार धक्का देत त्यांचा विश्वासू सहकारी फोडला होता. या धक्क्यातून शिरोळचे राजकारण अद्याप शांत झाले नसतानाच यड्रावकर यांनी पुन्हा एका मोठा राजकीय धमाका केला आहे. ज्याचे हादरे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना बसले आहेत. यड्रावकर यांनी राजू शेट्टी यांचा माजी आमदारच गळाला लावला आहे. ज्यामुळे शिरोळच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून शेट्टींना आगामी स्थानिच्या आधी जोरदार धक्का बसल्याची चर्चा आहे.
नुकताच काँग्रेस नेते तथा श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटलांचा विश्वासू सहकारी यड्रावकर यांनी फोडला होता. त्यांनी विश्वास उर्फ दादा काळे यांना फोडत थेट त्यांच्या पत्नी श्वेता विश्वास काळे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. यामुळे शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय चुरस निर्माण झाल्याचे येथे बोलले जात होते.
अशातच यड्रावकर यांनी पुन्हा एकदा राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ करणारा प्रवेश घडवून आणला. त्यांनी मास्टरस्ट्रोक खेळत उद्धव ठाकरेंसह स्वाभिमानी शेतकरी संघनेला जोरदार धक्का दिला. गेल्या काही दिवसापासून नाराज असलेल्या माजी आमदार उल्हास पाटील यांना गळाला लावत त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेत पक्षप्रवेश घडवून आणला. या प्रवेशामुळे एकाच वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसल्याचे आता बोलले जात आहे.
उल्हास पाटील हे मूळचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असून त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी डावल्यानंतर बंडखोरी करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या या राजकीय खेळीमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. तसेच त्यांनी शिरोळमधून शिवसेनेची उमेदवारी मिळवून निवडणूकही लढवली होती. यामध्ये त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागले होते.
दरम्यान 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिवसेनेत दोन गट पडल्याने उल्हास पाटील हे ठाकरेंच्या सेनेत राहिले. मात्र महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसला ही जागा गेल्याने त्या ठिकाणी गणपतराव पाटील यांना उमेदवारी मिळाली. यावेळी देखील उल्हास पाटील यांनी महाविकास आघाडीविरोधात बंडखोरी करत दंड थोपाटले. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा न देता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उमेदवारी जाहीर केली.
मात्र त्या ठिकाणीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पण स्वगृही परतलेल्या उल्हास पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ध्येय धोरणांचा विसर पडला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषद सह संघटनेच्या आंदोलनालाही त्यांनी दांडी मारली होती. मात्र याच दरम्यान त्यांनी आंदोलन अंकुशच्या आंदोलनाला उपस्थितीत दाखवत पक्षाशी ध्येय धोरणाशी फारकत घेतल्याचे दिसून आले होते.
गेल्या काही दिवसांपासून उल्हास पाटील यांच्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या. त्यांनी मार्च महिन्यात भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतल्याची चर्चा होती. यामुळे ते हाती कमळ घेतील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आता या फक्त चर्चाच ठरल्या असून त्यांनी यड्रावकर यांची भेट घेत थेट शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश आगामी नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समिकरणांना कलाटणी देणारा असून शिरोळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला बळ देणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.