Sanjay Patil, Nitin Gadkari
Sanjay Patil, Nitin Gadkari sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संजयकाका म्हणतात; मी ठेकेदाराचा एक रुपयाही खाल्लेला नाही

सरकारनामा ब्यूरो

खानापूर/आटपाडी : लोकांच्या कामासाठी भांडणे माझा स्वभाव आहे. त्याआधारे काहींनी मी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या पेरल्या. मात्र, मी पक्ष सोडून जाणार नाही. मी नितीन गडकरींचा चेला आहे. ते माझ्या मागे असताना मला मागे पाहण्याची गरज नाही. स्वच्छ काम केले असून एकाही ठेकेदाराचा एक रूपया ही खाल्लेला नाही, असे खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी सांगितले.

भिवघाट येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी (Farmers) मेळाव्यात संजय पाटील बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांचा बेदाणा आणि डाळिंबांचा हार घालून सत्कार करण्यात आला. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र देशमुख, विलासराव जगताप, राजाराम गरुड, अमरसिंह देशमुख, अँड. वैभव पाटील, निता केळकर, हर्षवर्धन देशमुख, प्रमोद शेंडगे, सुहास शिंदे, प्रकाश जमदाडे, सचिन शिंदे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ३० वर्षाच्या आमच्या मागण्या गडकरी यांच्यामुळे पूर्णत्वास येत आहेत. नितीन गडकरी यांनी अनुशेषाच्या बाहेर जावून टेंभू उपसा सिंचन योजनेला निधी मिळवून दिला. त्यामुळे टेंभूचे पाणी दुष्काळी भागात पोहोचले. यामध्ये एक रुपयाही कंत्राटदाराकडून घेतला नाही. एवढा स्वच्छ कारभार आम्ही करत आहेत.

नितीन गडकरी म्हणाले, जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी जगात चालणारा द्राक्ष वाण शेतकऱ्यांनी शोधले पाहिजे. शेतकरी समृध्द होण्यासाठी एकत्र येवून फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करुन फळे-भाजीपाल्याची परदेशात निर्यात वाढवावी आणि प्रक्रिया उद्योगात उतरावे. गडकरी यांनी दुष्काळ, पाणी, विकासाच्या नियोजनाचा अभाव, रस्त्याची केलेली कामे, शेती आणि शेतकरी त्याच बरोबर त्यांच्या अडचणी येऊ घातलेले बदल याचा आढावा मांडला. ते म्हणाले, ७५ वर्षात केवळ आश्वासने दिली. मात्र, कामे पूर्ण झाली नाही. विकास कामांसाठी योग्य नियोजनाची दृष्टी लागते. ती नव्हती. शेती व शेतकरी समृद्ध होण्यासाठी पाणी, विज, दर्जेदार खताची आवश्यकता असून प्रक्रिया उद्योग उभारले जावेत. गावे समृद्ध झाली पाहिजेत. त्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसा आला पाहिजे. ३० टक्के जनता गाव सोडून शहराकडे गेली आहे.

म्हैसाळ, ताकारी हे बंद पडलेले प्रकल्प प्रधानमंत्री व बळीराजा संजीवन योजनेत समाविष्ट करुन ती पूर्णत्वास आणली. ते पुढे म्हणाले, देशाला अन्न धान्यची कमी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नदाता न होता ऊर्जा दाता बनावे. शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग उभारले तर शेतीमालाला चांगला दर मिळेल. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. येणाऱ्या काळात द्राक्ष, डाळिंबांची जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी रांजणी येथे होणाऱ्या ड्रायपोर्टचा उपयोग होणार आहे. त्यामुळे त्याठिकाणी उद्योगाला चालना मिळेल. पुणे-बेंगलोर हायवेलगत स्मार्ट सिटी, मोठे उद्योग उभारावेत. त्यामुळे या भागातील तरूणांना काम मिळेल. यावेळी राजाराम गरुड, अमरसिंह देशमुख, शंकर मोहिते, वैभव पाटील यांची भाषणे झाली. स्वागत सुहास शिंदे यांनी तर प्रमोद शेंडगे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT