Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मोठी माहिती समोर येत आहे. या मतदारसंघातून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. आता मात्र त्यांनी या निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याची घोषणा माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केली आहे. बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेत संभाजी राजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
लोकसभा निवडणुकीत उभा राहायचं निश्चित होते. मात्र, ज्या वेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि आमचे वडील यांची इच्छा आहे. ते जर लोकसभा निवडणूक लढवत असतील तर माझा प्रश्नच येत नाही. शाहू महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. (Sambhajiraje Chattrapti News )
माझ्या निवडणुकीत 100 टक्के काम केलं असतं तर महाराज यांच्या प्रचारात 110 टक्के काम करणार. जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार असल्याची भूमिका संभाजी राजे यांनी स्पष्ट केली.
निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आमचं काम थांबणार नाही. वडिलांसाठी कष्ट करण्यात आम्ही कुठंही कमी पडणार नाही. शाहू महाराज, मालोजीराजे (Malojiraje) आणि मी एकत्रितपणे या निवडणुकीत काम करणार आहोत. कोल्हापूर हे नेहमी वेगळी दिशा देणारं शहर आहे. ते नेहमीचं देत राहणार. कोल्हापूरची निवडणूक आमच्यासाठी महत्वाची असल्याचे संभाजी राजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूरकरांची आणि शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची इच्छा आम्ही सगळे मिळून पूर्ण करू. हीच खरी वेळ आहे की पूर्ण ताकतीने काम करण्याची आणि त्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेनं काम करणार आहोत. स्वराज्य संघटनेची लोकसभेत कोणतीही भूमिका नाही. ती कुठेही निवडणुकीत उभे राहणार नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शाहू महाराज हे आमच्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण जीवाचं रान करू, अशी भूमिका संभाजी राजे छत्रपती यांनी स्पष्ट केली. इंस्टाग्रामवरून वडील आणि स्वतःचा फोटो शेअर केल्यानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली. घर किती एकसंघ आहे मी पोस्ट केलेल्या फोटोवरून लक्षात आले असेल. त्यांच्यासाठी आम्ही काहीही करू शकतो.
माहितीतील अनेक नेते शाहू महाराजांच्या वयाबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना खड्या शब्दात संभाजी राजे छत्रपती यांनी सुनावले आहे. जर शाहू महाराज छत्रपती यांच्या वयाबाबत बोलत असतील तर पंतप्रधान मोदींचे वय काय? शाहू महाराज यांचे वय विचारता मग मोदी यांचे वय काय आहे? शाहू महाराज याच वेळी निवडणुकीच्या रिंगणात का उतरलेत याचा त्यांनी विचार केला असेल. ते कोल्हापूर मतदारसंघात पूर्ण क्षमतेने फिरतील. रोज 500 बैठका, आणि हजार जोर मारणारे ते पैलवान आहेत, अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती (Sambhjiraje chhatrpati) यांनी विरोधकांना सुनावले.
(Edited By : Sachin Waghmare)