Kolhapur Bench of Bombay High Court notify : कोल्हापूरकर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. बॉम्बे हायकोर्टाचं बहुप्रतिक्षेत सर्किट बेंच कोल्हापुरात होणार हे आज निश्चित झालं. याबाबतचं नोटिफिकेशन हायकोर्टाचे मुख्य न्यायाधिश आलोक आराध्ये यांनी जाहीर केलं. यानंतर राज्यपालांच्या मंजुरीनं महाराष्ट्र शासनाचं गॅझेटही प्रसिद्ध झालं आहे. माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी देखील ही आनंद वार्ता सोशल मीडियात पोस्ट करुन दिली असून खुद्द सरन्यायाधिश भूषण गवई यांनी आपल्याला सर्वात आधी माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूरसह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच असणार आहे. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या समोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये गेली काही दिवस डागडुजी सुरू होती. मात्र, नोटिफिकेशन केव्हा निघणार हे अद्याप जाहीर न झाल्यानं सर्वांनीच याबाबत मौन बाळगले होतं. अखेर आज सायंकाळी हे नोटिफिकेशन निघालं आणि कोल्हापूर जिल्हा बारा असोसिएशनचे अध्यक्ष आणि खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व्ही. आर. पाटील यांनी याला दुजोरा दिला. 18 ऑगस्टला कोल्हापुरात हे सर्किट बेंच सुरू होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचं पाटील यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितलं.
गेली 40 वर्षे याबाबत सहा जिल्ह्यांचा लढा सुरू होता. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यापूर्वीही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे अशी जाहीर भूमिका घेतली होती. दरम्यान, या निर्णयानंतर आता बार असोशियनकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे. सर्किट बेंचमुळं पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या न्यायालयीन लढाईत कोल्हापूर मुंबई असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता यामुळं कोल्हापुरातच हायकोर्टाची न्याय प्रक्रिया होण्याची व्यवस्था झाली आहे.
खंडपीठावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, आज दिल्लीहून नागपूरला हवाई प्रवास करत असताना योगायोगानं भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचं व माझं विमानातील आसन लगतच होतं. यावेळी भेट होताच माननीय सरन्यायाधीश महोदय अत्यंत आनंदाने मला म्हणाले की, “राजे, पहिली आनंदाची बातमी तुम्हालाच देतो, कोल्हापूरचे खंडपीठ… सर्किट बेंच आजच नोटिफाय झालेलं आहे”
अगदी अचानक खुद्द देशाच्या सरन्यायाधीश महोदयांनीच दिलेली ही आनंदवार्ता ऐकून मन क्षणभर स्तिमित झालं. गेल्या अनेक वर्षांचा कोल्हापूर जिल्ह्यातील वकील बांधवांचा खंडपीठासाठीचा सातत्यपूर्ण लढा डोळ्यांसमोर तरळला. मी खासदार असताना केंद्रीय स्तरावर केलेला पाठपुरावा नजरेसमोरून गेला. अखेर या अनेक वर्षांच्या लढ्याला यश आल्याचे समाधानही मिळाले आणि खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांकडून ही आनंदवार्ता ऐकायला मिळाली, याचंही मनोमन समाधान व हर्ष वाटला. या खंडपीठासाठी लढा दिलेले वकील बांधव व सर्व कोल्हापूरकर व पश्चिम महाराष्ट्रातील जनता यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.