Mahayuti Leader Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Politic's : उपमुख्यमंत्री शिंंदेंसह पाच मंत्री आज सांगोल्यात; शहाजीबापूंच्या विधान परिषदेचा शब्द जाहीरपणे मिळणार?

Eknath Shinde Sangola Tour : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी सांगोल्यात येत आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रकाश आबीटकर हे मंत्री, तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत.

Vijaykumar Dudhale

Sangola, 10 April : विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच सांगोल्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अवघ्या सहा महिन्यांत दोन मोठे कार्यक्रम घेऊन सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपली सरकार दरबारातील आणि पक्षातील ताकद दाखवून दिली आहे. उपमुख्यमंत्र्यासह पाच मंत्री सांगोल्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचारसभेत एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द आणि पराभवानंतर शिष्टमंडळाला पक्षाच्या वरिष्ठांकडून मिळालेला आमदारकीचा शब्द सांगोल्याच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे जाहीरपणे देणार का, याकडे सांगोल्याचे लक्ष असणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज दुपारी सांगोल्यात येत आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रकाश आबीटकर हे मंत्री, तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत. सांगोल्यात आज तब्बल पाच मंत्री उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे सांगोल्यासाठी आणि शहाजीबापूंसाठी कुठली मोठी घोषणा होणार, याची उत्सुकता वाढली आहे.

‘काय झाडी, काय डोंगार काय हाटील..’ या डायलॉगमुळे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे महाराष्ट्राबाहेर सर्वदूर पोचले होते. खुद्द आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शहाजीबापूंच्या त्या डायलॉगची दखल घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्यासाठी जोरदार शाब्दीक बॅटिंग करणारे शहाजीबापू पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र, पराभवानंतरही त्यांनी सरकारमधील आणि शिवसेनेतील आपली ताकद दाखवून दिली आहे.

महायुती सरकारवर सत्तेवर येताच शहाजीबापू पाटील यांनी (स्व.) बाळासाहेब ठाकरे सिंचन योजनेचे अवघ्या काही महिन्यांत मोठ्या थाटामाटात भूमिपूजन करून घेतले. त्या कार्यक्रमासाठी खुद्द एकनाथ शिंदे येणार होते. मात्र, ऐनवेळी मुंबईतील अधिवेशन आणि इतर घडामोडींमुळे त्यांचा दौरा रद्द झाला होता. मात्र, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे आणि इतरांच्या उपस्थितीत तो भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्यात आला.

त्यानंतर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल पाच मंत्री आणि विधानसभेचे उपसभापती उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एकनाथ शिंदे यांनी तुम्ही बापूंना आमदार करा, मी नामदार करण्याचा प्रयत्न करतो, असे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, विधानसभेत शहाजीबापूंचा पराभव झाला.

विधानसभेतील पराभावानंतर शहाजी पाटील यांच्या राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द वरिष्ठांकडून दिल्याचे सांगितले जाते. त्यात पाटील यांना विधान परिषदेवर नक्की संधी देण्यात येईल, थोडा संयम ठेवा, असे सांगोला शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे सांगोल्याच्या दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याबाबत काही घोषणा करणार याकडे सांगोल्याचे लक्ष असणार आहे.

आमदारकीच्या काळात शहाजीबापू पाटील यांनी तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा केला जात आहे. आज राज्याच्या उपमुख्यमंत्र्यासह तब्बल पाच मंत्री सांगोल्यात येत आहेत, त्यामुळे सांगोल्यासाठी नव्याने काय मिळणार का, याचीही उत्सुकता तालुक्याला लागून राहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT