कऱ्हाड नगरपालिकेवर तब्बल 73 वर्षे दबदबा राखणाऱ्या (कै.) पी. डी. पाटील यांच्या घराण्यातील कोणीही यंदा उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही, त्यामुळे शहरात मोठी चर्चा आणि आश्चर्य व्यक्त होत आहे.
पी. डी. पाटील यांनी सलग 43 वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम करत शहराचा कायापालट केला, आणि त्यांच्या कार्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे; त्यांच्या काळात कऱ्हाड शहराची आधुनिक पायाभूत कामे उभी राहिली.
यंदा नगरपालिका निवडणुकीत सुमारे 330 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून तरुणांचा सहभाग मोठा आहे, त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी पाटील कुटुंबाने मागे राहिल्याची चर्चा आहे.
Karad, 17 November : कऱ्हाड (जि. सातारा) नगरपालिकेच्या इतिहासात ज्येष्ठ नेते (कै) पी. डी. पाटील यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी तब्बल ४३ वर्षे कऱ्हाड शहराचे नगराध्यक्षपद भुषवून कऱ्हाड शहराची देखणी रचना केली. त्यांच्या काळात कऱ्हाड शहराचा कायापालट झाला. तब्बल ७३ वर्षे कऱ्हाड नगरपालिकेत त्यांच्या घराण्यातील एक नगरसेवक कायम असायचा, त्यामुळे त्यांच्या नावाचा आजही दबदबा आहे. यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत मात्र त्यांच्या घरातील कोणीच नगरसेवक, नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही, त्यामुळे कऱ्हाड शहरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ नेते (कै) पी. डी. पाटील यांनी कऱ्हाड (Karad) शहराची घडी बसवली. ते वकील असूनही त्यांनी स्वतःला शहराच्या विकासासाठी झोकून दिले होते. ते १९५२ मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. मनमिळाऊ स्वभावामुळे अवघ्या वर्षभरातच त्यांची कऱ्हाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी १९५३ पासून कऱ्हाड नगरपालिकेचे नाव देशभरात पोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य केले.
ता. २० डिसेंबर १९५३ रोजी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले पी. डी. या पदावर सलग दोन वर्षे विराजमान झाले. ३० जानेवारी १९५६ ला ते पुन्हा नगराध्यक्ष झाले त्यानंतर ते सलग २५ वर्ष म्हणजे ५ फेब्रुवारी १९८१ पर्यंत नगराध्यक्षपदावर विराजमान होते. १९७४ ते १९७९ या पाच वर्षासाठी नगरसेवकाऐवजी (Corporator) नगराध्यक्षाची थेट मतदारातून निवडणूकीचा प्रयोग तत्कालीन सरकारने केला. त्यावेळी १८ डिसेंबर १९७४ रोजी सर्व मतदारांनी पी. डी. पाटील यांना नगराध्यक्षपदी निवडून दिले होते.
महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका बरखास्त करून तत्कालीन सरकारने ५ फेब्रुवारी १९८१ रोजी प्रशासकीय राजवट आणली होती. त्यानंतर १९८५ मध्ये पुन्हा नगरपालिकेची निवडणूक झाली आणि आणि १४ मे १९८५ रोजी पी. डी. पाटील यांच्या गळ्यात पुन्हा नगराध्यक्षपदाची माळ पडली. २० डिसेंबर १९५३ ते १६ डिसेंबर १९९६ अखेर त्यांनी ४३ वर्षे नगराध्यक्षपद भूषविले, त्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. त्यांचे पालिकेच्या इतिसाहात मोठे योगदान आहे.
पी.डी.पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सुभाष पाटील, सौरभ पाटील यांनीही शहरासाठी योगदान दिले. त्यांचा चांगला होल्ड नगरपालिकेवर असायचा. पाटील यांच्या घराण्यातील एक नगरसेवक कायम नगरपालिकेत असायचा. यंदा मात्र तब्बल ७३ वर्षांनंतर कऱ्हाड नगरपालिकेत त्यांच्या घराण्यातील कोणाीही नगराध्यक्ष, नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही, त्यामुळे शहरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
पी. डी. पाटील यांच्या काळातील कामे
जेष्ठ नेते (कै) पी. डी. पाटील यांनी त्यांच्या काळात शहराच्या वैभवात भर घालणारी विकास कामे उभी केली. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने स्मृतिसदन (टाऊन हॉल), देशातील पहिली तालुकास्तरावरील भुयारी गटर योजना, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची समाधी, त्यालगतची स्वामीची बाग, शहरातील महापुरुषांचे पुतळे, छत्रपती शिवाजी स्टेडियम, शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमी, उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर, भाजी मार्केट, वाचनालय, शॉपिंग सेंटर, पालिकेची इमारत यासह अन्य महत्वाच्या कामांची उभारणी केली.
तब्बल ३३० जणांचे नगरसेवकपदासाठी अर्ज
नगरपालिका निवडणूक ही तब्बल आठ ते नऊ वर्षांनी होत आहे. मध्यंतरीच्या चार वर्षांचा काळ प्रशासक राजमध्ये गेला. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात तरुणांची संख्या मोठी आहे. तब्बल ३३० जणांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे यावेळी कार्यकर्त्यांना संधी मिळावी या हेतूने (कै) पी. डी. पाटील यांच्या कुटुंबातील कोणीच उमेदवारी अर्ज भरला नसल्याची चर्चा आहे.
– नवीन कार्यकर्त्यांना आणि तरुणांना संधी मिळावी म्हणून ते मागे राहिल्याची चर्चा आहे.
– त्यांनी 43 वर्षे नगराध्यक्ष राहून कऱ्हाड शहरासाठी भुयारी गटर, स्टेडियम, टाऊन हॉल, स्मशानभूमी, भाजी मार्केट, वाचनालय यांसारखी महत्त्वाची कामे केली.
– 43 वर्षे नगराध्यक्षपद भूषविण्याची त्यांची नोंद गिनीज बुकमध्ये समाविष्ट आहे.
– एकूण 330 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, ज्यात तरुणांची संख्या मोठी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.