Sangali Politics: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Politics: आजी-माजी आमदारांची अस्तित्वाची लढाई; 8 नगराध्यक्षपदांसाठी 41 जणांनी ठोकला शड्डू

Sangli Elections 41 candidates for 8 mayor posts: सांगली जिल्ह्यातील आजी- माजी आमदारांची कसोटी या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे. शिवाय त्यांची आणि त्यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची राजकीय कसोटी लागणार आहे.

Rahul Gadkar

Sangali News: सांगली जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या २८ आणि नगरसेवकपदाच्या ३४७ अशा एकूण ३७५ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आठ नगराध्यक्षपदांसाठी ४१ तर नगरसेवकपदासाठी ५९४ उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे.

जिल्ह्यातील ईश्वरपूर, आष्टा, तासगाव, विटा, जत आणि पलूस या सहा नगरपालिका, तर शिराळा आणि आटपाडी या दोन नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला निवडणूक होत आहे. सांगली जिल्ह्यातील आजी- माजी आमदारांची कसोटी या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे. शिवाय त्यांची आणि त्यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची राजकीय कसोटी लागणार आहे. अर्ज माघारीच्या दिवशी आजी आणि माजी आमदारांचा दिवस जोडणीत गेला.

नेत्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराज बंडखोरांना शब्द देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याला काही ठिकाणी यश आले; परंतु काही ठिकाणी बंडखोरी झाली. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट सामना न होता स्थानिक राजकीय स्थितीनुसार चित्र बदलले आहे. महायुतीत अनेक ठिकाणी फूट पडली आहे, तर महाविकास आघाडीतही अंतर्गत विसंवाद समोर आला.

उरुण-ईश्वरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात महायुती अशी दुरंगी लढत होत आहे. महायुतीकडून भाजपचे विश्वनाथ डांगे विरुद्ध आनंदराव मलगुंडे अशी थेट लढत होत आहे. आष्टा येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार स्व. विलासराव शिंदे गट व जयंत पाटील यांच्या गटासमोर महायुतीचे आव्हान आहे. तेथेही दुरंगी लढत आहे. माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे विरुद्ध महायुतीकडून प्रवीण माने अशी दुरंगी लढत आहे.

विटा नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास बाबर विरुद्ध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व भाजप नेते वैभव पाटील यांच्या गटात दुरंगी निवडणूक होईल. आटपाडीत महायुतीमध्ये दुरंगी लढत होत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख विरोधात शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील अशी लढत आहे.

शिराळा नगरपंचायतीमध्ये दोन विरुद्ध भाजप-शिंदे गट शिवसेना अशी लढत होत आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजप आमदार सत्यजित देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यात रंगला आहे. जतमध्ये काँग्रेस, भाजप आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी निवडणूक होत आहे.

नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे सुजय शिंदे, भाजपकडून डॉ. रवींद्र आरळी आणि राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे अशी नगराध्यक्षपदासाठी लढत आहे. पलूस नगरपरिषदेसाठी तिरंगी लढत होत आहे. काँग्रेस, भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होईल. तासगाव नगरपरिषदेसाठी चौरंगी लढत होत आहे. आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय पाटील, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT