Siddaram Mhetre  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

एफआरपी मागणाऱ्या शेतकऱ्याला काँग्रेसच्या माजी मंत्र्याने दिली शिवी!

विश्वभूषण लिमये

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्याला घातलेल्या उसाचे थकीत बिल मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला या कारखान्याचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवी दिली. राज्याचे गृहराज्यमंत्री सांभाळलेल्या म्हेत्रे यांच्या या मुजोरपणावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हेत्रे यांच्या या कृतीचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. (Former Congress minister Siddaram Mhetre insuled at farmer demanding sugarcane bill)

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा अक्कलकोट तालुक्यात मातोश्री साखर कारखाना आहे. मागील वर्षी गाळप झालेल्या उसाची एफआरपी अजूनही मिळालेली नाही. उसाची थकीत रक्कम मिळावी, या मागणीसाठी मागील ११ दिवसांपासून सोलापूर शहरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. आंदोलक शेतकऱ्यांपैकी काहीजण आज (ता. ७ नोव्हेंबर) कारखान्याचे अध्यक्ष सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी थकीत एफआरपीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी अक्कलकोट येथे गेले होते.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी बोलताना असताना माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे यांचा संयम सुटला आणि त्यांनी संतापाच्या भरात शेतकऱ्याला शिवी दिली. बैठकीत ते म्हणाले की, सगळेजण शांत बसा. मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलून कोणाला पुढारपणं करायचं असेल तर आताच साखर कारखान्याला आग लावतो. तितका मी कडू आहे. या कारखान्यावर माझं पोट भरत नाही. असे बोलत असताना मध्येच एक शेतकरी ओरडल्यावर त्याला म्हेत्रे यांनी शिवी दिली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, या घटनेमुळे सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. अक्कलकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आंदोलन करणाऱ्या या उस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या राजू शेट्टी यांनीही म्हेत्रे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की आपल्या घामाचा मोबदला मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना शिव्या दिल्या जातात. शिव्याच द्यायच्या झाल्या तर त्यांच्यापेक्षाही जास्त घाण शिव्या आम्हाला देता येतात. मात्र ती आमची संस्कृती नाही. यावरून अक्कलकोटची संस्कृती कुठल्या थराला गेली आहे, याचा अंदाज येईल.’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT