Bhanudas Murkute join BRS :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhanudas Murkute join BRS : अखेर माजी आमदार भानुदास मुरकुटेंचा दे धक्का ! 'बीआरएस'मध्ये जाहीर प्रवेश

Nagar Politics : मुरकुटेंच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Political News : सहकाराच्या नगर जिल्ह्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना मोठा राजकीय नेता हाताला लागला असून गेल्या अनेक दिवसांपासून बीआरएस प्रवेशाच्या चर्चेत असलेले श्रीरामपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्ह्यातील सहकारतील मोठे नाव भानुदास मुरकुटे यांनी आज (22 जुलै) शंभरहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.

मुरकुटेंच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. प्रवेशावेळी बीआरएसचे नेते माजी आमदार अण्णासाहेब माने, महाराष्ट्र किसान सेलचे अध्यक्ष माणिकराव कदम, पुणे विभाग समन्वयक बी.जे.देशमुख, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, घनश्याम शेलार, अब्दुल कादीर मौलाना, बंजारा समाजाचे नेते प्रल्हाद राठोड, आमदार जीवन रेड्डी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. अशोक बँकेचे अध्यक्ष अॅड.सुभाष चौधरी, अशोक कारखान्याचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते असे तब्बल ११६ जणांचे शिष्टमंडळ तेलंगणाला दोन दिवसांपूर्वी गेले होते.

मुरकुटे यांनी गेल्या आठवड्यात तेलंगणाचा दौरा केला होता. तेथील विकास कामे पाहून ते भारावले आहेत. त्यामुळेच त्यांनी ११६ कार्यकर्त्यांना घेत पुन्हा तेलंगणा गाठले होते. या दौर्यादरम्यान आज (ता.२२) भारत राष्ट्र समिती पक्षात (बीआरएस) या सर्वांनी प्रवेश केला.

भानुदास मुरकुटे यांचा राजकीय प्रवास:

- मुरकुटे यांनी सर्वप्रथम १९७८ ला जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. १९८० ला भास्करराव गलांडे व दिनकर वाघ यांनी त्यांना श्रीरामपूर विधानसभेची काँग्रेस उमेदवारी मिळवून दिली. त्यांनी (स्व.) गोविंदराव आदिक यांचा पराभव केला. १९९० ला काॅंग्रेसकडून तिकिट न मिळाल्याने जनता दलात प्रवेश करत दुसऱ्यांदा आमदार झाले. १९९१ साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यासह जनता दलाच्या नऊ आमदारांनी प्रवेश केला. १९९५ साली काॅंग्रेसच्या तिकीटवर तिसऱ्यांदा आमदार झाले. शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यावेळी विद्यामान आमदारांमधून मुरकुटेंनी सर्वप्रथम पक्षात प्रवेश केला होता.

२००४ साली त्यांनी बाळासाहेब विखे यांच्याविरोधात शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढविली आहे. गेल्या काही वर्षांपासून लोकविकास आघाडीच्या माध्यमातून श्रीरामपूर भागात राजकीय मोट बांधली आहे. मुरकुटे यांचे सर्वच राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांशी जवळचे संबंध असून एक राजकीय दबदबा आहे. त्यामुळे त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याने अनेक राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील अनेक मोठी नावे पक्षाच्या गळाला लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT