Ramesh Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदम यांना कोर्टाचा दिलासा; पोलिस कोठडीची मागणी फेटाळली

या प्रकरणाच्या तपासासाठी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती.

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : अण्णा भाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांना सोलापूरच्या (Solapur) विशेष न्यायालयाने (Court) दिलासा दिला आहे. पोलिस कोठडीची (Police custody) मागणी फेटाळून कदम यांना दोन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (Former MLA Ramesh Kadam judicial custody)

अण्णा भाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांनी पदाचा गैरवापर करून महामंडळाच्या निधीचा अपहार केला होता. रमेश कदम यांनी त्यांची आजी श्रीमती बायमा गणपत क्षीरसागर (रा. नांदणी, ता. बार्शी, जि.सोलापूर) यांच्या नावाने दुग्ध व्यवसायाचे कर्ज मंजुरीचे बेकायदेशीर आदेश तयार कर्ज मंजूर केले आहे, असे खोटे भासवले. ते खरे आहे, असे दाखवून महामंडळाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे व इतरांवर दबाव टाकून ४ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला.

या प्रकरणी महामंडळाची व सरकारची फसवणूक केल्याची फिर्याद अनिल राघोबा म्हस्के यांनी ३१ मे २०१७ रोजी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी माजी आमदार रमेश कदम यांना आज न्यायालयासमोर हजर केले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती.

आरोपी माजी आमदार रमेश कदम यांच्या वतीने ‘कदम यांच्याकडून काहीही हस्तगत करण्याचे नसल्याने तसेच संबंधित गुन्हा हा कागदोपत्री पुराव्याचा भाग असल्याने पोलिस कोठडीची गरज नाही,’ असा युक्तिवाद ॲड मिलिंद थोबडे, ॲड विनोद सूर्यवंशी, ॲड दत्ता गुंड यांनी मांडला. त्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी पोलिसांनी केलेली दोन दिवसांची पोलिस कोठडीची मागणी फेटाळून लावली. कदम यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीतर्फे ॲड मिलिंद थोबडे, ॲड विनोद सूर्यवंशी, ॲड दत्ता गुंड यांनी, तर सरकारी पक्षातर्फे ॲड. दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT