False military officer Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सैन्यात नोकरी देण्याचे आमिष दाखविणारा तोतया अधिकारी गजाआड

देशप्रेमाने भारावलेले अनेक तरूण सैन्यात भरती होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून असतात.

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर - महाराष्ट्रात सात कटक मंडळे आहेत. देशप्रेमाने भारावलेले अनेक तरूण सैन्यात भरती होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून असतात. यातील काहींना लष्करात भरती करतो असे सांगणारे तोतया सैनिक भेटतात. पैशाची मागणी करता मोजके युवक या भूलथापांना फसतात. आणि आर्थिक तोटा करून घेतात. अहमदनगर शहरा लगतही कटक मंडळ आहे. तेथे लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणांना फसविणारा आरोपी नवनाथ सावळेराम गुलदगड (वय 24, रा. आंग्रेवाडी, ता. राहुरी) यास पकडण्यात आले आहे. लष्कराच्या इंटेलिजेन्स ब्युरोच्या दक्षिण कमांड आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या संयुक्‍त पथकाने ही कारवाई केली. ( Fraud officer arrested for recruiting army )

नवनाथ गुलदगड लष्कराचा गणवेश घालून काळ्या रंगाच्या स्कॉपिओ कमांडो असे लिहून संगमनेर, राहुरी परिसरात फिरत होता. लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आपण लष्करात अधिकारी पदावर कार्यरत असल्याचे सांगत होता. काही तरुणांना कर्नल, कॅप्टन तर काहींना सुभेदार पदावर कार्यरत असल्याचे सांगून त्यांच्याकडून लष्करात भरती करण्याच्या आमिषाने पैसे घेत होता.

लष्कराच्या इंटेलिजेन्स ब्युरोच्या दक्षिण कमांड विभागाला माहिती मिळाली. लष्कराने ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिली. या माहितीच्या आधारे लष्कराच्या इंटेलिजेन्स ब्युरो आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपी नवनाथ गुलदगड याचीविरुद्ध शोध मोहीम सुरू केली.

मांडवा बुद्रुक (ता. संगमनेर) येथे तो आल्याची माहिती मिळाली. संयुक्‍त पथकाने मांडवा गावात जाऊन त्याला नाव, पत्ता विचारला असता, त्याने आपण लष्करात बंगळूर (कर्नाटक) येथे लेफ्टनंट पदावर असल्याचे सांगून ओळखपत्र दाखविले. लष्कराच्या इंटेलिजेन्स ब्युरोमधील अधिकाऱ्यांनी लष्करातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या खात्री केली असता, तो लष्करात कोणत्याही पदावर नसल्याचे निष्पन्न झाले.

त्याची झडती घेतली असता, बनावट ओळखपत्र, लष्करी अधिकाऱ्याचा ड्रेस, नेमप्लेट, लष्करात भरती होण्यासाठी वेगवेगळ्या तरुणांकडून भरून घेतले फार्म, छापिल नियुक्‍तीपत्र आदी साहित्य आढळून आले. नोकरीच्या आमिषाने फसवणूक झालेल्या एका तरुणाच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी नवनाथ गुलदगड याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्यांना संपर्क साधण्याचे आवाहन

आरोपी नवनाथ गुलदगड याने नोकरीच्या आमिषाने राहुरी आणि संगमनेर तालुक्‍यातील अनेक तरुणांना फसविले आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा तरुणांनी राहुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी केले आहे.

पत्नीला ही फसविले

अभियंता शाखेची पदवीधर तरुणीला नवनाथ गुलदगड याने फसवून लग्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची लग्नपत्रिका पोलिसांना मिळाली आहे. या लग्न पत्रिकेत त्याने पॅराकमांडो असे लिहिलेले आहे. याच लग्नपत्रिका नातेवाईक, मित्र परिवार आणि गावामध्ये वाटप केल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT