- राजेंद्र त्रिमुखे
Ahmednagar Politics News : राज्यात गाजलेल्या राहाता तालुक्यातील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आठ-दहा वर्षे ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखान्यावर भाजपचे विवेक कोल्हे आणि माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पॅनेलने एकहाती सत्ता मिळवत विखेंना त्यांच्याच मतदारसंघात जोरदार धक्का दिला. गणेश कारखान्याच्या या विजयामुळे मंत्र्यांचा त्रास कमी झाल्याचे सांगत थोरातांनी चांगलेच खडे बोल सुनावले.
संगमनेर मतदारसंघातील एका कार्यक्रमात थोरातांनी मंत्र्यांकडून कशाप्रकारे त्रास दिला जातो याचा पाढा वाचला. महसूल यंत्रणेला हाताशी धरून त्रास दिला जात आहे. कनोली सारख्या गावच्या तलाठ्याला मंत्री फोन करून वाळू वाहतूक होऊ देऊ नका असे सांगत आहेत. साधे गाईच्या गोठ्यात मुरूम टाकायचा तरी विखे यांचे खबरी ट्रॅक्टर पकडून देतात, कनोलीच्या तलाठ्याला मंत्री स्वत: फोन करतात की वाळू वाहतूक करून देऊ नका. गौण खनीजाचा वापर सामान्य लोकाच्या विकासकामासाठीच होतो. मात्र, त्याच्यावरही बंदी हे कसले राजकारण अशा राजकारणाचा तालुक्याचा काहीही उपयोग नाही, अशा कडक शब्दांत थोरातांनी फटकारले.
निळंवडे धरणाचे व कालव्यांची कामे आपण अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केली. पिचडांनी त्यासाठी मदत केली. मात्र, ज्यांचे योगदान नाही त्यांनी पाटाचे पाणी बंद केले. जनतेचा आनंद त्यांना बघवला नाही, असे विखे यांचे नाव न घेता बोलले.
संगमनेर मतदारसंघात आपल्याला सत्ता नसतानाही आपण चांगली कामे करत आहोत. त्रास देणारे देत आहेत. मात्र, तालुका आपल्या पाठीशी आहे आणि आपल्या हिंमतीवर आपण कामे मार्गी लावत आहोत. अडचणी आणणारे आणत असले तरी, गणेश साखर कारखाना निवडणुकीच्या निकालाने चांगला चाप बसला असल्याचे थोरात यांनी नमूद करत विखेंवर निशाणा साधला आहे.