Uddhav Thackeray Birthday : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसामुळे विधान परिषदेचे कामकाज सायंकाळी सहाला तहकूब करावे या अनिल परब यांच्या सुचनेवर भाजपचे प्रवीण दरेकर यांनी शेरेबाजी केली. त्यामुळे परब आणि दरेकरांत चांगलीच जुंपली. त्याचे पर्यावसान `एसआरए` विधेयक मंजूर न होता परत गेल्याने भाजपच्या पायावर धोंडा पडला. (SRA Bill send back in result of Darekar & Parab`s verbal altercation)
शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसाच्या विषयाबाबत भाजपचे (BJP) प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या अनावश्यक शेरेबाजीने राज्य सरकार व भाजपचे (BJP) काल चांगलेच नुकसान झाले.
राजकीय अभिनिवेशातून केलेली अनावश्यक शेरेबाजी अनेकदा इतरांना किती अडचणीची ठरू शकते, याचा अनुभव काल विधानपरिषदेत पहायला मिळाला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा काल वाढदिवस होता.
प्रथेप्रमाणे शिवसेनेचे आमदार सायंकाळी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जाणार होते. त्यामुळे शिवसेना नेते अनिल परब यांनी परिषदेचे काम सायंकाळी सहाला पूर्ण करावे अशी सूचना मांडली. तेव्हा तालीका सभापती अनिरूद्ध डावखरे होते. त्यांनी याबाबत सभापतींशी बोलून ठरवू असे सांगून कामकाज सुरू ठेवले होते.
त्यानंतर सभापती नीलम गोऱ्हे आल्यावर हा विषय पुन्हा निघाला. तेव्हा सभापतींनी काहीच प्रतिक्रीया दिली नाही. मात्र भाजपचे प्रवीण दरेकर यांनी `ज्यांना जायचे त्यांनी जावे, काम थांबविण्याची गरज नाही` अशी शेरेबाजी केले. त्यामुळे परब संतापले. त्यांनी असे असेल तर आम्ही देखील प्रत्येक बीलावर चर्चा करणार आहोत, असे प्रत्युत्तर दिले. त्यावर बराच गोंधळ झाला. सभापतींनी सदस्यांना शांत करण्याचा खुप प्रयत्न केला, मात्र शाब्दीक बाण सुटतच होते.
याच दरम्यान तुलनेने नवखे असलेले मंत्री अतुल सावे यांना झोपडपट्टी पुर्नवसन विधेयक मांडायचे होते. यासंदर्भात न्यायालयात शुक्रवारी सुनावणी असल्याने ते मंजूर होणे खुप आवश्यक होते. सरकारतर्फे तशी विनंती करण्यात आली होती. सभापतींच्या दालनातील बैठकीत त्याला सहकार्य करण्याचे ठरले देखील होते.
मात्र दरेकरांच्या शेरेबाजीमुळे या विषयाचा चांगला अभ्यास असलेल्या परब यांनी विविध शंका विचारल्या. त्याने मंत्री सावे गडबडले. त्यामुळे सभागृह दहा मिनीटे तहकूब करून सभापतींच्या दालनात त्यावर चर्चा झाली.
पुन्हा सभागृहात आल्यावर अनिल परब यांनी चर्चा सुरू करत नेमकेपणाने त्रुटींवर बोट ठेवल्याने शेवटी हे विधेयक परत पाठवावे लागले. त्यामुळे राज्य सरकारची आणि विशेषतः भाजपची मोठी अडचण झाली. अनावश्यक शेरेबाजीने प्रवीण दरेकर यांनी भाजपच्याच पायावर धोंडा पाडून घेतला. कारण शेवटी सर्व काम पूर्ण झाल्यावर सभागृह सहाच्या दरम्यान तहकूब झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.