कोल्हापूर : राहुल गडकर
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला बहुमत मिळाले असले, तरी कायद्यातून पळवाट काढत महायुतीने अखेर गोकुळ दूध संघावर आपला अध्यक्ष बसवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची अध्यक्षपदी १६ विरुद्ध १३ मतांनी निवड झाली. तर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना १३ मते मिळाली.
दरम्यान, शासननियुक्त चार सदस्यांची स्वतंत्रपणे मतमोजणी झाली. या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेमुळे आमदार सतेज पाटील यांना धक्का बसला आहे. दरम्यान, कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर सतेज पाटील यांची पुढील न्यायालयीन लढाई ठरणार आहे. तत्पूर्वी, सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला १३ जागांचे बहुमत, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या होत्या. समविचारी आघाडीकडे बहुमत असले, तरी सभेची गणपूर्ती होण्यासाठी १४ सदस्यांचा कोरम आवश्यक होता. हाच मुद्दा पकडून २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या अध्यक्षपद निवडीच्या सभेला महायुतीच्या संचालकांनी अनुपस्थिती लावल्याने पहिली सभा तहकूब झाली होती.
मात्र, महायुतीने मोठा डाव खेळत थेट शासन निर्णय जारी करून शासननियुक्त सदस्यांची संख्या चार केली आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा अध्यादेश काढला. या अध्यादेशामुळे गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष बसवण्याचा मार्ग सुकर झाला. न्यायालयीन लढाईतही न्यायालयाने या शासननियुक्त सदस्यांचे मतदानाचे अधिकार कायम ठेवले.
दरम्यान, समविचारी आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांची तिसऱ्यांदा संधी हुकली. २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेला महायुतीचे संचालक अनुपस्थित राहिल्याने त्यांची संधी हुकली होती. तर मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या गटाची सत्ता असताना माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर शशिकांत पाटील यांना संधी देण्याचे ठरले होते. मात्र, महायुतीचा अध्यक्ष करण्याचे ठरल्याने त्यावेळी नविद मुश्रीफ यांना अध्यक्ष करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.