Gokul Oath Controversy; hasan mushrif And KP Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Oath Controversy : शपथप्रकरण पेटलं; मुश्रीफांसह माजी आमदार अडचणीत? गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यपालांना निवेदन

Hasan Mushrif And K P Patil Gokul oath controversy : गोकुळ दूधसंघांची निवडणूक पार पडली असून आमदार सतेज पाटील यांची सत्ता आली आहे. पण निवडणुकीच्या धामधुमीत घडलेलं शपथप्रकरण आता पेटलं असून नवा मुद्दा समोर आला आहे.

Aslam Shanedivan

Kolhapur News : कोल्हापूर गोकुळ दूध संघाच्या ठरावधारकांना देवस्थान सहलीवर नेऊन शपथ दिल्याचा आणि शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक होण्याची भीती घालणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करत कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत. तसेच, त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद रद्द करावे, अशी मागणी डावी आघाडी व समविचारी पुरोगामी संघटनांनी केली.

यासंदर्भात राज्यपाल आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र जादूटोणा व नरबळीविरोधी कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करावी, भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून चौकशी समिती नेमावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीशचंद्र कांबळे यांनी केली. निवडणुकीच्या काळात मतदारांवर अशा प्रकारे दबाव आणणे निंदनीय असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत यादव यांनी सांगितले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला धक्का पोहोचत असल्याचा आरोप केला. इर्शाद फरास यांनी संबंधितांवर निवडणूक कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण पोलिसांकडे पाठवून योग्य ते आदेश देण्याचे आश्वासन दिले. गरज पडल्यास साक्षीदार किंवा फिर्यादी म्हणून पुढे येण्याची तयारीही शिष्टमंडळाने दर्शविली.

नेमके प्रकरण काय?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू असताना महायुतीच्या नेत्यांनी ठरावधारकांना सहलीवर पाठवले होते. आचारसंहिता लागू असताना या ठरावधारकांना कर्नाटकातील सौंदत्ती येथे नेण्यात आले होते. या ठिकाणी ठरावधारकांकडून शपथा घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मंत्री हसन मुश्रीफ हे देवीच्या प्रकोपाची भीती ठरावधारकांना घालत असल्याचे दिसत होते.

सर्व २५ उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण सौंदत्ती डोंगरावर आलो असून, आपल्यासह सर्वांनी शपथ घ्यायची आहे, असे मुश्रीफ या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत होते. तसेच, यल्लमा देवी किती जागृत आहे, हे तुम्हाला माहीत आहे. कोणी खोटे वागले, तर देवीचा प्रकोप होतो, अशा आशयाचे वक्तव्यही त्यांनी केल्याचे व्हिडिओतून समोर आले होते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महायुतीविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे नेते आणि माजी आमदार के. पी. पाटील यांचाही एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये त्यांनी बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, असे विधान त्यांनी केल्याचा आरोप करण्यात आलाय. गेल्या निवडणुकीत एका व्यक्तीने बाळूमामाची शपथ मोडली आणि त्याच्या घराण्याला राजकीय हादरा बसला, असे धक्कादायक वक्तव्यही त्यांनी केले. दरम्यान, मतदानापूर्वी आदमापूर येथील बाळूमामा मंदिर परिसरात महायुतीकडून शपथ दिल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली होती.

देवाच्या शपथांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत वारंवार देवाच्या शपथा घेतल्या जात असल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकारावर आमदार सतेज पाटील यांनी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता, यापूर्वीही असे अनेक प्रयोग झाले असून, संबंधित नेत्यांनी स्वतः अनेक ठिकाणी जाऊन शपथा घेतल्याचा दावा केला होता.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवस्थानांमध्ये शपथा घेण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण तापले असून, आता या प्रकरणी संबंधित नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी डावी आघाडी आणि पुरोगामी संघटनांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT