Gokul News: गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. मागील पाच वर्षात नव्याने वाढलेल्या 1200 ठरावाविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांनी वाढवलेल्या बाराशे ठरावाविरोधात कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून या बाराशे संस्था ठरावांची नोंदणी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात कोल्हापूर खंडपीठासमोर मार्च महिन्यात पहिली सुनावणी होणार आहे.
मागील निवडणुकीत जवळपास 3900 संस्था सभासद नोंदणी होती. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या सत्ताधारी गटाने मागील पाच वर्षात याच सभासद नोंदणीची संख्या 5831 इतकी केली आहे.
मागील पाच वर्षाचा विचार केल्यास अठराशे संस्थांची नव्याने नोंद केली आहे. मात्र, ज्या नवीन संस्था तीन वर्षांपर्यंत नियमित दूध संकलन, लेखापरीक्षण आणि निवडणूक घेतात. त्या संस्थांचे मतदान हे ग्राह्य धरले जाते. त्यामुळे निवडणुकीला मतदानास पात्र असणाऱ्या 5470 इतक्या संस्था आहेत.
महाडिक गटाने सातत्याने या वाढलेल्या संस्थांच्या लेखापरीक्षण आणि दूध संकलनाची माहिती गोकुळ प्रशासनाकडे वारंवार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागितली होती. मात्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात यासंदर्भात कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती.
शिवाय लेखापरीक्षणासंदर्भात गोकुळच्या प्रशासनाकडून कोणतीच भूमिका घेण्यात आली नव्हती. मात्र, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे महायुतीचे घटक बनले. त्यामुळे विरोधात असलेला महाडिक गटानेसुद्धा गोकुळ मधील विरोधातील भूमिका मवाळ केली.
मागील पाच वर्षात या वाढीव संस्थांमध्ये सर्वाधिक ठराव हे मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील गटाचे आहेत. यंदा 5470 इतके ठराव मतदानास पात्र आहेत. त्यामुळे मॅजिक फिगर ही 2800 मतांची इतकी आहे. वाढलेल्या ठरावांचा विचार केल्यास मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याबाबत हे ठराव निर्णायक ठरू शकतात. मात्र यापूर्वीच 400 पेक्षा अधिक ठराव हे रद्द केल्याने उर्वरित बाराशे ठराव रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मात्र, या नव्याने वाढलेल्या बाराशे संस्था या नियमित दूध संकलन करत असतील. शिवाय मागील तीन वर्षाचे लेखा परीक्षण या संस्थांकडे असेल, तर न्यायालयात ही याचिका केवळ पोकळ ठरू शकते. मात्र, या संस्थांचं लेखापरीक्षण आणि नियमित दूध संकलन नसेल तर त्याचा फटका मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील गटाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पदाचा वापर करून गोकुळ दूध संघात अनेक संस्था वाढवल्या आहेत. यातील काही संस्थांचे नियमित दूध संकलनही नाही. प्रामाणिक अधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. पदाचा दुरुपयोग करून हे प्रकरण दडपले होते. मात्र, आम्ही निवडणुकीच्या तोंडावर ह्या संस्था रद्द कराव्यात अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. या अगोदर 475 संस्था रद्द झाले आहेत तर उर्वरित बाराशे संस्था रद्द करण्याची मागणी आमची आहे.
- प्रकाश बेलवडे, याचिकाकर्ते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.