Mahadev Jankar Satej Patil Gokul Election  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election Results: निवडणुकीआधी 'खासगीकरणा'चा बॉम्ब, सतेज पाटलांनी 'गोकुळ'मध्ये महायुतीचा टांगा पलटी करताच जानकरांचं मोठं विधान, केलं सावध

Gokul Mahayuti vs Mahavikas Aaghadi : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी बाजी पलटवली असून मुश्रीफांसह महायुतीला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. याचदरम्यान,राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकरांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

Deepak Kulkarni

Kolhapur News: कोल्हापुरासह संपूर्ण राज्याचं लक्ष हे गोकुळ दूध उत्पादक संघाच्या निवडणूक निकालाकडे लागलेलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे बडे नेते सतेज पाटील आणि महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ,तसेच भाजपचे धनंजय महाडिक यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पण सध्यातरी गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी बाजी पलटवली असून मुश्रीफांसह महायुतीला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. याचदरम्यान,राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकरांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

माजी दुग्धविकास मंत्री व रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी गोकुळच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली होती. ते महायुती सरकारच्या काळात मंत्री असताना गोकुळ दूध संघाचे खासगीकरण करण्यासाठी आणि त्याला बहुराज्य (मल्टीस्टेट) दर्जा देण्यासाठी त्यांना 200 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा धक्कादायक दावा केला होता. या दाव्यानंतर आता त्यांनी गोकुळच्या निकालाचे काही अपडेट समोर येत असतानाच सोमवारी(ता.19 ऑक्टोबर) नवा राजकीय बॉम्ब टाकला आहे.

महादेव जानकर म्हणाले, गोकुळ दूध संघ सतेज पाटलांच्या ताब्यात राहिला, तर शेतकर्‍यांचं हित होईल,या मताचा मी आहे. कोल्हापूरची जनता हुशार आहे. ज्या शाहू राजानं तिथं सुरुवात केली, तो बहुजनांचा कनवाळू होता. त्यामुळे जनता ही पूर्णपणे सतेज पाटलांबरोबर राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे. पण सत्ताधारी पक्ष जगातले मोठे पक्ष आहेत. ते सर्व एकत्र आले आहेत. त्यामुळे थोडंसं अस्वस्थ वाटतंय असं म्हटलं.

जानकरांनी निकालाचा कौल समोर आल्यानंतरही गोकुळमध्ये निकालानंतर महायुतीकडून फोडाफोडीचं राजकारण होण्याबाबतचे संकेत तर दिले नाही ना,अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावेळी महादेव जानकर यांनी गोकुळच्या निवडणुकीत जनता,शेतकरी हा बंटी पाटलांच्याच सोबत राहील, असा ठाम विश्वास महादेव जानकरांनी व्यक्त केला आहे.

रासपचे महादेव जानकर म्हणाले,माझं एवढंच म्हणणं आहे की,कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांचं राज्य होतं. आणि शाहूंचं राज्य हे आदर्श राज्य होतं. तसेच शेतकर्‍यांना न्याय देणारं राज्य होतं. त्यावेळी गोकुळ दूध संघ हा मल्टिस्टेट होऊ नये म्हणून काही लोकांनी मदत केली,त्यात सतेज पाटील हे एक नामांकित नाव होते. त्यांच्यामुळेच गोकुळ दुधसंघ हा शेतकर्‍यांचा राहिला असं मत जानकर यांनी व्यक्त केलं.

मी ही शेतकर्‍याचा मुलगा असल्यानं त्याची बाजू घेऊन लढत राहिलो. मतदारांनी त्यांचा कौल मतपेटीतून दिला असल्याची भावना महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी सर्व रथी-महारथी एका बाजूला असताना माझे मित्र बंटी पाटील हे एका बाजूला आहे.त्यामुळे सतेज पाटलांच्या मेहनतीला सलाम केलं पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

महादेव जानकर म्हणाले,माझं म्हणणं इतकंच आहे की,कोणताही निर्णय होताना तो कोल्हापुरातून व्हावा. आनंदराव पाटील-चुयेकर यांनी गोकुळ दुधसंघ स्थापना केला. बंटी पाटलांनी त्यांच्या मुलाला गोकुळचं चेअरमन केलं.त्यामुळे मला मानणारा जो वर्ग आहे, त्या सर्वांना मी सांगितलं होतं की, बंटी पाटलांचा पॅनल हा शाहूचा पॅनल आहे,त्याला साथ द्यावी ,असा खुलासाही जानकरांनी गोकुळच्या निकालाचा कौल समोर येत असताना केला आहे.

त्यांनी यावेळी बंटी पाटलांचं पॅलन विजयी व्हावं, या विचारांचा मी आणि राष्ट्रीय समाज पक्ष आहे. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार,आमच्या विरोधातल्यांच्या 12 जागा आहेत, आणि आम्ही ज्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे,त्यांच्या 14 जागा आहेत.त्यामुळे जनतेचा कौल हा जनतेच्याच हातात आहे, तो तुम्ही मी सांगणार नाही.

महादेव जानकर यांनी प्रचारादरम्यान, गोकुळ दूध संघाचे खासगीकरण करण्यासाठी आणि त्याला बहुराज्य (मल्टीस्टेट) दर्जा देण्यासाठी त्यांना 200 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. कोल्हापुरातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहावा यासाठी त्यांनी या कोट्यवधींच्या आमिषाला ठोकर लावल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांनी या कामासाठी पाच पैसेही घेतले नाहीत, अशी शपथही त्यांनी घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT