BJP NCP Dispute : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुती मधील स्पर्धा अधिक रंगत चालली आहे. संस्था सभासदांच्या ठरावावरून महायुतीमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना आज पुन्हा एकदा याच ठरावावरून भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले.
ठराव निश्चिती करण्याचा गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रयत्न सुरु असताना राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार के. पी. पाटील आणि कार्यकर्त्यांवर भाजपच्या समर्थकांनी आक्षेप घेतला. यामुळे काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झाले असतानाच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भाजप कार्यालयात धावत यावे लागले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती मधील समन्वय राखण्यासाठी गुरुवारी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका खाजगी हॉटेलमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत काही ठरावांवर आक्षेप घेण्यात आले होते. तर अनेक सभासदांनी दोन्ही नेत्यांकडे ठराव दिल्याने त्याचा पेच निर्माण झाला होता.
भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, आणि जनसुराज्याकडे प्रत्येकी किती ठराव? अशी स्वतंत्र संख्या ठरवण्याचे धोरण निश्चित झाले होते. शिवाय ज्याच्याकडे डबल ठराव आले आहेत त्या संदर्भात प्रत्यक्ष ठराव धारकांना संपर्क करून संबंधित भूमिका काय, याची विचार न करण्याचे धोरण ठरले होते. त्यानुसार आज भाजपकडून पक्ष कार्यालयामध्ये भाजपकडे एकूण ठराव किती? यावर बैठक आयोजित केली होती.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून भाजपकडून जमा झालेले ठराव धारक दाखल झाले होते. त्यासाठी चंद्रकांत पाटील, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. दरम्यान ठराव निश्चिती होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रतिनिधी म्हणून माजी आमदार के. पी. पाटील आणि काही मोजके पदाधिकारी भाजप कार्यालयात दाखल झाले.
बैठकीदरम्यान डबल ठराव दाखल झाल्यावरुन भाजप समर्थक आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. ठराव धारकांना संपर्क करून आपला ठराव कोणाच्या बाजूने असेल? याबाबत विचारणा केली. त्यावेळी काही ठराव धारकांनी आपण भाजपच्या बाजूने असल्याचे सांगितले. यावर भाजप कार्यकर्त्यांनी आपला चांगलाच संताप दाखवून दिला.
भाजपचे ठराव मोजण्याचा अधिकार राष्ट्रवादीला कोणी दिला? अशी विचारणा समर्थकांनी केली. यावेळी जोरदार वादावादी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ठराव धारकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेल्या सभासदांचा रोष वाढल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांनाच भाजपच्या कार्यालयात यावे लागले. हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक यांच्यासह काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर निश्चित बैठकीच्या ठिकाणी हे सर्वजण दाखल झाले.
चंद्रकांत पाटील यांचा आक्षेप
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके ठराव कोणते यावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील हे माहिती देत होते. तेच ठराव भाजपकडे असल्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर आक्षेप घेतला. यानंतर झालेल्या तणावानंतर मंत्री पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना संपर्क करून तात्काळ भाजप कार्यालयात बोलावून घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.