Kolhapur Politics News: गोकुळची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यापासून मागील पाच वर्ष वाढवलेल्या नवीन सभासदांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षातच अंतर्गत कुरघोड्या सुरू झाल्या नंतर प्रकरण न्यायालयात गेले. चौकशी लागल्यानंतर नियमांचं पालन न करणाऱ्या 427 आणि आवसायानातील 541 दूध संस्था या मतदानाला अपात्र ठरल्यानंतर त्याचा फटका महायुतीलाच बसला आहे.
भाजपने आडून केलेल्या तक्रारीचा डाव हा महायुतीवरच उलटला आहे. पण या डावामुळे मंत्री मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांचे भविष्यातील गोकुळ वरील वर्चस्वाचे मनसुबे उधळले आहेत. इतकेच नव्हे तर मागील पाच वर्षात गोकुळचे संचालक चेतन नरके, संचालिका शौमिका महाडिक यांची केलेली कोंडी ही महाविकास आघाडी व महायुतीच्या अंगलट आली आहे.
2021 च्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत तब्बल 3800 सभासद संस्था मतदारांनी मतदान केले. गोकुळमध्ये यावेळी सत्तांतर झाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात गोकुळमध्ये सत्ता स्थापन केली.
2021 ते 2023 पर्यंत या काळात सत्ताधाऱ्यांनी जवळपास 1277 दुध संस्था नव्याने वाढवल्या. वास्तविक गोकुळ दूध संघाचे दूध संकलन मागील पाच ते दहा वर्षात तितकेच आहे. दूध संकलन वाढले नसताना सत्ताधाऱ्यांकडून अनेक संस्था वाढवण्यात आल्या. वाढवण्यात आलेल्या दूध संस्था या निवडणुकीत किंवा पुढील भविष्यकाळात आपल्यासाठी डोकेदुखी आणि अडचणीच्या ठरू शकतात. याची जाण झाल्यानंतर भाजपकडून या संस्थांना आव्हान देण्यात आले.
त्या संदर्भात न्यायालयीन लढाई देत या संस्था अपात्र कराव्यात, अशी मागणी केली. सोमवारी विभागीय दुग्ध निबंधक प्रशासनाकडून प्रलंबित असणाऱ्या 427 व आवसायानातील 541 दूध संस्थांवर अपात्रितेची कारवाई केली. अशा एकूण 968 दूध संस्था आहेत. या दूध संस्थांना मतदानाचा अधिकार नाही. यामध्ये अपात्र केलेल्या संस्थांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 255, शिंदेसेनेच्या 175, भाजप 70, इतर 100 तर महाविकास आघाडीच्या 201 संस्थां आहेत.
मध्यंतरी आदेश आणि अवसायानातील या संस्था अपात्र करण्यासाठी भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील आणि गर्जना संघटनेचे प्रकाश बेलवाडे यांनी या संस्थानी पोटनिमांचा भंग केल्याने या संस्था अपात्र कराव्यात अशी मागणी केली होती. चौकशी समितीच्या अहवालानंतर 427 आणि पावसाळ्यातील 541 संस्था मतदानासाठी अपात्र ठरवले. येत्या निवडणुकीत या संस्था अपात्र ठरवण्यासाठी भाजप यशस्वी झाले असले तरी त्याचा फटका महायुतीलाच आहे. कारण सर्वाधिक संस्था या महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या असल्याचे समोर येत आहे.
वाढवलेल्या दूध संस्था ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सत्ताधारी मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडून वाढवण्याचा संशय भाजपला आहे. शिवाय या वाढवलेल्या संस्था भविष्याच्या गोकुळ राजकारणात आपल्याला अडचणीचा ठरू शकतात. याचा अंदाज आल्यानेच आतापासूनच मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. भविष्यात महायुती म्हणून एकत्र राहील अगर ना राहील. त्याचा फटका भाजपला बसू नये याची काळजी घेतलेली दिसून येते.
गोकुळचे संचालक चेतन नरके आणि संचालिका शौमिका महाडिक हे मागील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होते. मागील पाच वर्षातील सत्ताधाऱ्यांनी आपल्या व्यक्तिगत दूध संस्था वाढवण्यास भर दिला. त्यासाठी कोणता निकष लावायचा? कोणते नाही. याची तमा न ठेवता घाईगडबडीने दूध संस्था वाढवल्या. मात्र विरोधक असलेले चेतन नरके आणि शौमिका महाडिक यांच्याकडून संस्था वाढू नयेत यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.
इतकेच नव्हे तर संस्था वाढीसाठी दिलेले अर्ज देखील विचारात घेतले नाहीत. ब वर्गाच्या संस्थांना अ वर्गाचा दर्जा देण्यासाठी करण्यात आले अर्ज देखील फेटाळण्यात आले. मात्र पाच वर्षात अनेक राजकीय समीकरण बदलले. सध्या चेतन नरके हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत. शिवाय शौमिका महाडिक या महायुतीमध्ये आहेत. वाढवलेल्या संस्था या फायद्याच्या ठरल्या असत्या. पण त्यांची त्यावेळी केलेली कोंडी आज दोन्ही आघाडीच्या अंगलट आली अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.