Kolhapur Politics : लोकसभा निवडणुकीत गोकुळचे संचालक चेतन नरके हे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जात आगामी निवडणुकीत पाटील यांच्यासोबत असणार असे जाहीर केले होते. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत माजी संचालक अरुण नरके व डॉ. चेतन नरके काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या सोबत असण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मात्र गेल्या काही दिवसांपासून आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवणाऱ्या नरके गटाने अखेर आपली भूमिका स्पष्ट करत गोकुळमध्ये महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. तर नरके गट सोमवारी शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल करणार आहेत. यावेळी माजी संचालक अरुण नरके आणि माजी आमदार महादेवराव महाडिक एकाच गाडीतून प्रवास करणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) पंचवार्षिक निवडणूक मागील वेळी महायुती अर्थात माजी आमदार महादेवराव महाडिक, दिवंगत आमदार पी. एन. पाटील आणि ज्येष्ठ नेते अरुण नरके यांच्या पॅनेलमधूनच लढवली होती.
ही निवडणूक महायुतीकडूनच लढणार असल्याचे गोकुळचे माजी संचालक डॉ. चेतन नरके यांनी स्पष्ट केले.डॉ. चेतन नरके यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी तब्बल २३३ ठराव धारकांनी डॉ. नरके यांना पाठींबा दिला.
यावेळी कार्यकर्त्यांनी महायुतीसोबतच जाण्याचा निर्णय घ्यावा, असा आग्रह केला. यामुळे डॉ. चेतन नरके यांनी मागील वेळी जी आघाडी होती, त्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार महादेव महाडिक आणि ज्येष्ठ नेते अरुण नरके यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.२९) मेळावा होत आहे.
डॉ. चेतन नरके म्हणाले, गेली पाच वर्षे मी ‘गोकुळ’मध्ये विरोधातच राहिलो आहे. त्यामुळे मी कोठे दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. मागील वेळी माझी जी आघाडी होती. त्याच आघाडीसोबत यावेळीही निवडणूक लढवणार आहे. मी नव्या आघाडीत जातोय, किंवा महायुतीसोबत जातोय असा प्रश्नच निर्माण होत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.