Kolhapur News, 27 Apr : गोकुळ दूध संघावरील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ येत्या 4 मे रोजी संपणार आहे. त्यापूर्वी बाराशे सभासदांच्या अपात्रतेबाबत न्यायालयीन लढाई सुरू असल्याने निवडणूक लांबणीवर पडली आहे. मात्र कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच प्रशासक येण्याची शक्यता आहे.
मात्र येणारा प्रशासक हा प्रशासकीय असणार की अप्रशासकीय असणार याबाबत राज्यस्तरावर पडद्यामागच्या हालचाली सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी अदृश्य शक्ती बरोबर आजरा तालुक्यातील महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी सत्ताधाऱ्यांना खास करून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना जेरीस आणले आहे.
आता मात्र गोकुळ दूध संघावर अप्रशासकीय प्रशासक आणण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली असून यामध्ये गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, माणिक पाटील-चुयेकर, आणि प्रकाश बेलवाडे यांची नावे चर्चेत आहेत. जर गोकुळ दूध संघावर प्रशासक म्हणून यापैकी एकाची नियुक्ती झाल्यास पुन्हा एकदा मे महिन्यात गोकुळचे राजकारण तापणार आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकुळ) प्रशासक नियुक्ती होईल का नाही, याची खात्री नाही, पण या पदासाठी काहींनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा आहे. प्रशासक नियुक्तीचा निर्णय झालाच तर या पदावर सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल की, राजकीय कार्यकर्त्यांची, याविषयी संभ्रमावस्था असूनही काही जण या पदासाठी पुढे सरसावले आहेत.
गोकुळ’ने निवडणुकीच्या तोंडावर सुमारे १२०८ नव्या संस्था नोंदवल्या आहेत. या संस्था बेकायदेशीरपणे नोंदविल्याचा आरोप करत त्या विरोधात प्रकाश बेलवाडे यांनी थेट न्यायालयात आव्हान दिले आहे. या सर्व न्यायालयातील प्रक्रियेमुळे ‘गोकुळ’ची निवडणूक लांबण्याची शक्यता आहे. नवे सभागृह अस्तित्वात यायचे झाल्यास निवडणूक कार्यक्रम आता सुरू होणे अपेक्षित होते; पण न्यायालयीन प्रक्रियेचा अडसर यात आहे.
याच दरम्यान सरकारने सहकार विभागाची नवी अधिसूचना जारी केली असून ‘अ’ वर्ग संस्थेच्या संचालकांची मुदत संपल्यास त्याचदिवशी संबंधित संस्थेवर प्रशासक नियुक्तीची कारवाई करण्यात येणार आहे. परिणामी, ‘गोकुळ’वर कोणत्याही परिस्थितीत प्रशासक नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित आहे.
नेमकी हीच संधी साधून प्रशासक होण्यासाठी काहींनी प्रयत्न सुरू केले आहेत. संघाचे संस्थापक दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर यांचा वारसा सांगत माणिक पाटील-चुयेकर हे पदाच्या स्पर्धेत उतरले आहेत. भाजपकडून संचालिका शौमिका महाडिक व संघाच्या संस्थांबाबत थेट न्यायालयात आव्हान देऊन सत्ताधाऱ्यांची कोंडी केलेले प्रकाश बेलवाडे यांचेही या पदासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.