Kolhapur drought news : राज्यात पावसाने ओढ दिल्याने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश आहे. पावसाळ्यातच दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना बसत असताना कोल्हापुरात मात्र गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सभासदांवर कोट्यावधीचा चुरडा केला जाणार आहे.
प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणाला सुरुवात होत असतानाच या सभासदांना टोकन ट्रीप आणि आलिशान व्यवस्था करण्यासाठी कोट्यावधीचा खर्च केला जाणार आहे. वास्तविक यातील काही ठराव धारक हे नेत्यांचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्यावर पैशाची खैरात केली जाणार आहे. दुष्काळ हा राज्यातील जनतेसाठी असेल मात्र गोकुळच्या सभासदांसाठी सुकाळ आणण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे. मात्र दुष्काळाच्या झळा या दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहेत हे नक्की.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा या तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. सध्या महिना दीड महिन्यांपासून पावसाने दळी दिल्यामुळे माळरान किंवा शेतवडीत देखील पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना आगामी काळात त्याचा फटका बसू शकतो. गाय व म्हैस दुधांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
राज्यात एकमेव असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधीच होत नाहीत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे गोकुळ दूध संघ आहे. या दूध संघांमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली बनली आहे. मात्र सध्या हे सहा तालुके दुष्काळाच्या छायेत असल्याने भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठराव गोळा करण्यासाठी टोकन ची चर्चा जोरात सुरू आहे.
एका ठरावाला लाखाची बोली बोलली जात आहे. जसजशी ही निवडणूक अंतिम टप्प्यात येईल तसतशी ही आणखीन रंगली जाणार आहे. ठरावाचे भाव आणखीन गगनाला भेटणार आहेत. अर्ज माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर ठराव धारकांसाठी आलिशान व्यवस्था, टोकन आणि त्यांच्या सहलीचं नियोजन केले जात आहे. यावर कोट्यावधीचा चुरडा लोकप्रतिनिधींकडून होण्याची शक्यता आहे. तशा घोषणा देखील वारंवार लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी खुल्या व्यासपीठावर केल्या आहेत.
जिल्ह्यातील सहा तालुके हे दुष्काळाच्या छायेत असताना केवळ ठराव धारकांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसाठी काबाडकष्ट करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये पन्हाळा तालुक्यात 513, राधानगरी 699, गगनबावडा 131,भुदरगड 593, आजरा 305, चंदगड 423 मध्ये इतके ठराव आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ठराव धारकांसाठी हा सुकाळ असणार आहे. मात्र या दुष्काळाशी दूध उत्पादकांनाच दोन हात करावे लागणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.