Gokul Election | Mahayuti Seat Sharing Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election : महाडिकांना मुश्रीफांची मर्जी सांभाळावी लागणार; मुख्यमंत्र्यांच्या भेटीत विषय संपवला, गोकुळच्या राजकारणाचा 'यु टर्न'

Gokul Election Mahayuti Seat Sharing : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनिमित्ताने संस्थांचा पात्र अपात्रेवरून वाद धुमसत होता. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष टोकाचा होत असताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. त्यामुळे गोकुळमधील वाद हा विकोपाला गेला होता.

Rahul Gadkar

Kolhapur News, 21 Sep : गोकुळ दूध संघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना महायुतीमधील अंतर्गत वर्चस्वाचा वाद उफाळून आला आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांच्या भेटीने हा वाद आता संपुष्टात आला आहे. महायुतीमध्ये सर्वात मोठा भाऊ हा राष्ट्रवादी काँग्रेसच ठरणार असून महाडिक गटाला आता मंत्री हसन मुश्रीफ यांची मर्जी सांभाळावी लागणार आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची संपूर्ण विजयाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्यावर सोपवली असून भाजपकडून उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादीमधील समन्वयाची भूमिका साधावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी जवळपास गोकुळच्या निवडणुकीतील विषय संपला असून लवकरच त्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी सरकारनामाला दिली आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनिमित्ताने संस्थांचा पात्र अपात्रेवरून वाद धुमसत होता. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष टोकाचा होत असताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. त्यामुळे गोकुळमधील वाद हा विकोपाला गेला होता. शिवाय अदृश्य शक्तीकडून सुरू असलेला टोकाचा विरोध त्यामुळे महायुतीमधील फूट जगजाहीर होती. अखेर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीची नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सुरू असताना गोकुळ मधील महायुतीच्या घडामोडीने वेग घेतला आहे.

महायुती म्हणून एकत्र लढत असताना या निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ होईल असा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. अखेर मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे आणि जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र गोकुळचे राजकारण पालटले आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे नेतृत्व हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. शिवाय महायुतीमधील सर्वच घटक पक्षांचे उमेदवार निवडून येतील याची जबाबदारी मंत्री मुश्रीफ यांच्यावरच देण्यात आली आहे. कोणत्याही उमेदवाराला दगा होणार नाही, याची काळजी मुश्रीफ यांना घ्यावी लागणार आहे. त्यांच्या जोडीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे यांच्यावर देखील ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून भाजपमधील अदृश्य शक्ती, आमदार शिवाजीराव पाटील विरुद्ध मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य शक्ती व शिवसेना यांच्यातील संबंध दुरावले आहेत. गोकुळमधील वाद विकोपाला गेल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या घडामोडीतून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली होती. तर चर्चेची संपूर्ण जबाबदारी महाडिक गटाकडे देण्यात आली होती. त्यामुळे अनेक संस्थांचा रोष भाजपकडे होता.

त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महायुतीमधील समन्वय राखण्याची भूमिका सोपवली आहे. शनिवारी त्यांनी कोल्हापुरातील एका खाजगी हॉटेलमध्ये भाजप तालुका प्रमुखांची बैठक घेत सर्वांची समन्वय साधून भूमिका जाणून घेतल्या. दरम्यान महायुतीमधील जागावाटप हे ठरावाच्या संख्येनुसार होणार हे जवळपास निश्चित करण्यात आले होते. शिवाय आता पक्षनिहाय जागावाटप केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामध्ये पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागा त्यानंतर भाजप, शिवसेना, जनसुराज्य शक्ती व शाहू आघाडी, तर ठरावानुसार झाले तर दुसरा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, जनसुराज्य व शाहू आघाडी असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या काही नेत्यांनी बिनविरोधच्या निवडणुकीला पसंती असल्याचं सांगितले जात होते. मात्र आमदार सतेज पाटील हे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक घेण्याच्या तयारीत असल्याने भाजपची अडचण झाली आहे.

त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाच झुकते माप देण्याची तयारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे सांगितले जाते. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागा देण्याचा प्रस्ताव समोर ठेवला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांची मर्जी सांभाळवी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा दिल्यास हसन मुश्रीफ यांच्या गटाचा रोष कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय मंत्री हे समजूत काढण्यात यशस्वी होतील असे भाजपच्या नेत्यांचा समज आहे. त्या दृष्टीने देखील चर्चा झाली असून संस्था सभासदांचा गैरसमज दूर करण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनीच भूमिका घ्यायचे ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT