

Kalyan Crime News : भाजपच्या सर्व पदांवरून राजीनामा दिलेल्या माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. कल्याण शहरातील एका २२ वर्षीय विवाहित तरुणीने शस्त्राचा धाक दाखवत दारू पाजवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात आरोप केला आहे. यावरून पडघा पोलिसांनी त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
मात्र अद्याप अटक झालेली नाही. यावरूनच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा आमदार वरुण सरदेसाई यांनी कल्याणमध्ये पवार यांच्या अटकेबाबत सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी, भाजपच्या माजी आमदाराला बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही अटक का झाली नाही? असा सवाल केला आहे. ते पक्षाच्या आढावा बैठकीसाठी कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय आणि स्थानिक प्रश्नांवर भूमिका मांडली.
कल्याण शहरातील पीडित तरुणीचा पतीसोबत वाद सुरू होता. हा वाद मिटवण्याच्या नावाखाली माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांनी पीडितेला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेनं केला आहे. ज्यानंतर माजी आमदार पवार यांच्यांसह बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर असणाऱ्या पवार यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना पत्र पाठवत राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली. तसेच आपल्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा खोटा असून आपली बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा देखील नरेंद्र पवार यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात केला होता. तसेच या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी आपण पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी या पत्रात दिले आहे.
त्यांच्या या राजीनाम्याने कल्याण परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. तर पवार यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी सत्ताधाऱ्यांवरच सवाल उठवले आहेत. सरदेसाई यांनी, पवार यांच्या अटकेबाबत सवाल उपस्थित करत, बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक का झाली नाही? असा प्रश्न विचारला आहे.
सरदेसाई यांनी विरोधी पक्षातील एखाद्या नेत्यावर छोटासा गुन्हा दाखल झाला तरी सत्ताधारी पक्षाकडून त्याच्यावर जोरदार टीका केली जाते. त्यानंतर मीडिया ट्रायल सुरू होते. त्याच्यावर आरोप होतात. मात्र, अशा माजी आमदारावर असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित व्यक्ती भाजपची असल्यानेच संरक्षण दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर पवार हे भाजपचे आहेत म्हणून त्यांना कोणतेही संरक्षण न देता कायद्यानुसार तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.
लोकांची कामे कधी होणार?
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकीय परिस्थितीवरही सरदेसाई यांनी भाष्य केले. केडीएमसीमध्ये अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नियुक्तीबाबतही ठोस निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. सरदेसाई यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावरूनही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. दोन्ही पक्षांमध्ये भांडण सुरू आहे. मग लोकांची कामे कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.