Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील पाच शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीच्या निर्णयाविरोधात आज (ता. ९) कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्यात आला आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून सकाळी दहा वाजल्यानंतर या मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे. या आंदोलनात राजकीय विरोधाबरोबरच शेतकरी आणि दूध उत्पादकांचा संतापही पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, मोर्चात तब्बल २० फूट उंचीचे कोल्हापुरी पायताण, यम, बळीराजा आणि रेडा यांची प्रतीकात्मक मांडणी करण्यात आली असून ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
गोकुळ दूध संघावर पाच शासननियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयामुळे कोल्हापुरातील सहकार क्षेत्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. गोकुळच्या २५ पैकी १३ जागा जिंकूनही राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला महायुतीच्या राजकीय खेळीमुळे सत्तेपासून दूर राहावे लागणार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांनी रस्त्यावरची लढाई लढण्याबरोबरच न्यायालयीन लढाईचाही इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीकडून दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात आमदार सतेज पाटील यांच्यासह जयंत पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी सहभागी झाले आहेत. मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी, महिला आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. काही शेतकरी लहान मुलांना खांद्यावर घेऊन आंदोलनात उतरले असून नागरिकांनी काळे झेंडे दाखवत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.
या मोर्चाचे सर्वाधिक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे आंदोलनासाठी करण्यात आलेली अनोखी प्रतीकात्मक सजावट. बैल, गायी, म्हशींसह दूध उत्पादक शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. एका म्हशीच्या अंगावर 'गोकुळ वाचवा' असा संदेश लिहिण्यात आला आहे. तर 'आमची म्हैस पण म्हणते, मला पण संचालक म्हणून गोकुळवर घ्या', असा उपरोधिक टोला शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
मोर्चात तब्बल २० फूट उंचीचे कोल्हापुरी पायताण आणण्यात आले आहे. याशिवाय बळीराजा नांगर घेऊन आंदोलनात सहभागी झाला असून यमाची प्रतीकात्मक वेशभूषाही लक्ष वेधून घेत आहे. 'इडा-पिडा टळू दे', असा संदेश देत शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.
आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या बॅनर्समधूनही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. 'सहकाराच्या जोरावर लोकशाही संपवता येत नाही', 'गोकुळवर राजकीय सावट नको' आणि 'लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली', अशा घोषवाक्यांमधून शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.
एका बॅनरवर 'गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा, यांनी विधानसभेसाठी काय काय केले असेल? ही संघर्षाची शेवटची दिवाळी असू दे, हे कोल्हापूर हाय!' असा मजकूर लिहिण्यात आला आहे. तर दुसऱ्या बॅनरवर 'एक खासदार कमी होता म्हणून राजीनामा देणारे अटलजी कुठे? आणि एक संचालक कमी आहे म्हणून चार संचालक नियुक्त करणारे कुठे?' असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 'गोकुळचा निर्णय पाहिला आणि वाटले, इंग्रज आणि यांच्यात फरक काय राहिला? भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची वेळ आली आहे का?' अशा शब्दांतही संताप व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी या मोर्चाला किती गर्दी होणार, याबाबत शंका उपस्थित केली होती. त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाल्याचे सांगितले. मोर्चात महिलांचा सहभागही लक्षणीय दिसून येत आहे. एकीकडे गोकुळच्या सत्तासंघर्षावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक आंदोलनातून आपला रोष व्यक्त केला आहे. कोल्हापुरी पायताण, यम, बळीराजा, म्हशी आणि लक्षवेधी बॅनर्समुळे या संघर्ष मोर्चाची शहरभर चर्चा सुरू झाली आहे. आता या आंदोलनानंतर शासन नियुक्त संचालकांच्या निर्णयाबाबत सरकार काय भूमिका घेते आणि न्यायालयीन लढाईत काय घडते, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.