Mahabaleshwar Palika, Pallavi Patil
Mahabaleshwar Palika, Pallavi Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महाबळेश्वरकरांना गुड न्यूज; घरपट्टीत मिळणार पाच टक्क्यांपर्यंत सूट

अभिजित खुरासणे

महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील पर्यावरणपूरक इमारती व नियम पाळणाऱ्या मिळकतधारकांना नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या निर्णयामुळे घरपट्टीमध्ये सुमारे पाच टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत झालेल्या या निर्णयाची एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे.

महाबळेश्वर पालिका हद्दीतील मिळकतधारकांना येथील बांधकामातील पर्यावरणपूरक नियम पाळल्यास सुमारे ५ टक्क्यांपर्यंत घरपट्टीमध्ये सूट मिळण्यासाठी मुख्याधिकारी पाटील यांनी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत केला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवकांनी चार वर्षांपूर्वी घरपट्टी वाढीसंदर्भात चुकीच्या पध्दतीने निर्णय घेतल्याने मिळकतधारकांचे धाबे दणाणले होते.

अनेकांच्या मिळकतींना सुमारे दहा पटीपेक्षा जास्त घरपट्टीच्या दरामध्ये वाढीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे अनेक मिळकतधारकांना न्यायालयात जावे लागले होते. त्याचा पालिकेच्या वसुलीवरही परिणाम झाला. पालिकेला पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने पालिकेचा उदरनिर्वाह होत असल्याने त्याची झळ पालिकेला लागली नसली तरी, पालिकेच्या मुख्य आर्थिक स्‍त्रोताची बाजू अडचणीत आलेली आहे.

महाबळेश्वर हे पावसाचे आगार आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. परंतु, पडणाऱ्या पावसाचे पाणी हे डोंगर उताराने वाहून जाते. सध्या वाढत असलेली लोकसंख्येला व येणाऱ्या लाखो पर्यटकांना वापरासाठी पाणी कमी पडू नये, यासाठी केवळ पाणी साठवणूक करून चालणार नाही तर जमिनीत पाणी मुरविणेही गरजेचे असल्याचे महत्त्‍व नागरिकांना कळावे, यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी घरपट्टीमध्ये रेनवॅाटर हार्वेस्टिंगसाठी एक टक्का सूट जाहीर केली आहे.

आपल्या इमारतीवर सौर ऊर्जेचा वापर करून पारंपरिक ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना एक टक्का सूट, घरगुती किंवा व्यावसायिक वापरामध्ये इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणाऱ्यांना दोन टक्के सूट अशी एकूण चार टक्के सूट जाहीर केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार घरपट्टीची मागणी पालिकेने केल्यानंतर ती १५ दिवसांत भरल्यास आणखी एक टक्का सूट मिळत असल्याने घरपट्टीमध्ये भरघोस अशी पाच टक्के सूट मिळकतधारकांना मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT