सातारा : पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार आज मतदारांची कच्ची यादी प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे लवकरच या कारखान्याची निवडणूक होणार असून पारंपारिक विरोधक असलेले कारखान्यांचे अध्यक्ष, भाजपचे नेते व माजी आमदार मदन भोसले व राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांची पॅनेल रिंगणात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
किसन वीर साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत असून यावर्षी कारखान्याचे गाळप विद्यमान अध्यक्ष व संचालकांनी सुरू केलेले नाही. त्यामुळे कार्यक्षेत्रात असलेल्या मोठ्याप्रमाणात ऊसाचा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे शेजारी असलेल्या कारखान्यांकडे ऊस घालण्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. तसेच ऊस बिलाची मागील थकबाकी मिळावी, यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर आता या कारखान्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. नुकतीच पुणे विभागीय प्रादेशिक सहसंचालकांनी किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज कच्ची मतदार यादी कारखान्याचा नोटीस बोर्डवर तसेच सहायक निबंधक कार्यालय व वाई तहसीलदार कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे.
या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष मदन भोसले लक्ष घालणार का, तसेच वाईचे आमदार मकरंद पाटील हे पॅनेल टाकणार का, याकडे वाईसह पाच तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारखाना आर्थिक अडचणीत असतानाही निवडणूक होत असल्याने यामध्ये भाजपचे मदन भोसले व राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांची पॅनेल परस्पर विरोधात ठाकणार का, याची उत्सुकता आहे.
या निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणजे मतदार यादी प्रसिद्ध करण्यापासून होत आहे. आज मतदारांची कच्ची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. आता २४ फेब्रुवारीपर्यंत मतदारांच्या प्रारूप यादीवर हरकती व आक्षेप दाखल करण्यास मुदत आहे. २४ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत दाखल हरकती व आक्षेपावर निर्णय घेण्यास मुदत देण्यात आली आहे.
या हरकती व आक्षेप प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग येथे घेता येणार आहेत. त्यानंतर ११ मार्चला अंतिम मतदार यादी किसन वीर कारखाना, सहायक निबंधक कार्यालय, वाई तहसीलदार कार्यालय व पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी प्रसिद्ध होणार असल्याचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी धनंजय डोईफोडे यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.