Sangli DCC Bank Election News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत विकास सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविल्याने जिल्हा बँकेच्या राजकीय समीकरणाचे गणित बदलले आहे. यामुळे भाजप नेत्यासह माजी मंत्री जयंत पाटील यांचे मनसुबे उधळले आहेत. गेल्या सहा महिन्यापासून जिल्हा बँकेच्या कार्यपद्धतीवर आवाज उठवणाऱ्या पडळकर यांना या निर्णयामुळे पुरते बळ मिळाले आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून पडळकरांना प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी संधी चालून आली आहे. त्यामुळे काहींना ही निवडणूक बिनविरोध करावी असे वाटत असले तरी सध्या ही चर्चा सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे फिस्कटणार असेच चित्र दिसते.
या निर्णयामुळे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला धक्का बसल्याचे मानले जात असून, बिनविरोधच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून जिल्हा बँकेतील गैरकारभाराविरोधात आवाज उठवला जात होता. शिवाय माजी मंत्री जयंत पाटील यांना देखील टार्गेट करण्यात आले होते.
आमदार पडळकर यांच्या अर्जावर कुणीकोनूर सर्वसेवा सहकारी सोसायटीच्या आणि निंबवडे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील संचालकपदाच्या अनुभवावर माजी आमदार सावंत आणि सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी अर्ज वैध ठरविल्यानंतर त्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अपील केले होते. तेथे अर्ज अवैध ठरल्यानंतर पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
आमदार पडळकर म्हणाले, 'माझा अर्ज वैध ठरविल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. जिल्हा बँकेत प्रस्थापितांविरोधात मी आवाज बनून जाणार आहे. कार्यकर्त्यांनी निवडणुकीत शांततेने काम करावे,असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले.
आतापर्यंत सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेहमीच जयंत पाटील यांनी सर्वपक्षीय राजकारण केले आहे. नेहमीच आपल्याच मर्जीतील असणाऱ्या व्यक्तीला त्यांनी जिल्हा बँकेत संधी दिली आहे. त्यामध्ये शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. मात्र आता आमदार गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्याने जयंत पाटलांचे जिल्हा बँकेतील खेळी यंदा उधळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.