भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून गदरोळ झाला असून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पडळकरांना समज दिली.
शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी खात्री व्यक्त केली की पडळकर आता असे बोलणार नाहीत, तसेच प्रशासन व नेत्यांवर मर्यादा पाळून भाष्य करावे, असा सल्ला दिला.
संजय राऊत यांच्या आनंद दिघेंवरील वक्तव्यावर शहाजीबापू पाटील यांनी त्यांना इशारा देत मोरे यांच्या प्रतिक्रियेला समर्थन दर्शवले.
Sangola, 22 September : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून राज्यात जोरदार गदरोळ उठला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून नाराजी व्यक्त केली होती, तर फडणवीसांनीही पडळकर यांना समज दिली आहे. आता शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी ‘गोपीचंद पडळकर इथून पुढं असं बोलणार नाहीत,’ अशी खात्री बोलून दाखवली आहे.
शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले, माजी मुख्यमंत्री (स्व.) वसंतदादा पाटील आणि (स्व.) राजारामबापू पाटील यांची घरं नसून ती जनतेची मंदिरं आहेत. त्या घरांवर शक्यतो कोणी काहीही बोलू नये.
आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे बहुजन समाजाचे तरुण तडफदार भविष्य असलेले नेते आहेत. दुर्दैवाने अलिकडच्या काळात ते रागाच्या भरात बोलून थोडी अडचण निर्माण करत आहेत. पण, इथून पुढं ते बोलणार नाहीत, असं ते काल म्हणाले आहेत आणि मला खात्री आहे की, गोपीचंद पडळकर इथून पुढं असं बोलणार नाहीत, अशी खात्री पाटील यांनी व्यक्त केली.
माजी आमदार पाटील म्हणाले, सरकार चालवताना प्रशासन हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने बोलू नये. प्रशासन कोलमडलं तर शासन कोलमडतं. आमदार रोहित पवार यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चांगली संधी दिली आहे. त्यांच्या आशीर्वादानं रोहित पवारांचं चांगलं चाललं आहे. त्यांनी अधिकाऱ्यांवर जास्त बोलून पवार घराण्याची प्रतिमा डागाळू नये. रोहित पवार यांच्या वर्तनामुळे कळत न कळत शरद पवार यांच्या प्रतिमेला डाग लागतोय, असं मला वाटतंय.
खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून शिंदेसेना त्यांच्यावर तुटून पडली आहे. आमदार मोरे यांनी संजय राऊतांना धमकी दिली आहे. त्यावरही शहाजीबापू पाटील यांनी भाष्य केले आहे.
ते म्हणाले, ज्या वेळी आनंद दिघे यांनी ठाणे, पालघर या भागात शिवसेना उभी केली. शिवसेना प्रमुखांचे विचार घराघरांत पोचवले, त्या वेळी संजय राऊत हा पाळण्यात झोके घेत होता. त्या वेळी राऊत हे बाळ होते आणि या बाळाने आनंद दिघे यांच्या कारकिर्दीची अशी अवहेलना करणं, त्यांच्या व्यक्तीमत्वावर शिंतोडे उठवणे गैर आहे.
संजय राऊत यांनी काय बोलायचं, हे ठरवलं पाहिजे. टीका करताना मर्यादा पाळली पाहिजे. संजय राऊत असंच बोलणार असेल तर मोरेंच्या पाठीशी मी आहे. ते बोलले ते बरोबरच आहे. कारण ॲक्शनला ती रिॲक्शन आहे.
संजय राऊतांना मोरे यांच्या धमकीचे वाईट वाटण्याचे कारण काय? तुम्ही आगाऊ बोलणार असाल तर आम्ही आगाऊ वागलो तर संजय राऊतांनी वाईट वाटून घेऊ नये. आम्हीही त्यातलचं आहोत, तुझं आडव-तिडवं बघण्याइतकी आमच्यातही ताकद आहे. गुवाहाटीला जाऊन एकदा हिसका दाखवला आहे, पुन्हा मैदानात हिसका दाखवू आम्ही, असा इशाराही शहाजीबापू पाटील यांनी केला.
प्र: गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर काय कारवाई झाली?
उ: शरद पवारांनी फडणवीसांना फोन करून नाराजी व्यक्त केली आणि फडणवीसांनी पडळकरांना समज दिली.
प्र: शहाजीबापू पाटील यांनी पडळकरांबाबत काय म्हटले?
उ: ते पुढे अशा प्रकारे बोलणार नाहीत, अशी खात्री व्यक्त केली.
प्र: संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया काय होती?
उ: त्यांनी राऊतांना मर्यादा पाळण्याचा सल्ला देत मोरे यांच्या तीव्र प्रतिक्रियेला पाठिंबा दिला.
प्र: प्रशासनावर बोलण्याबाबत पाटील यांचा सल्ला काय आहे?
उ: प्रशासनावर अनावश्यक आरोप केल्यास शासन कोलमडू शकते, त्यामुळे नेत्यांनी संयम बाळगावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.