Solapur, 11 May : कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील एका शेतकऱ्याने तब्बल 600 गोणी कांदा पेटवून दिला आहे. कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
कांद्याच्या बाजारभावात झालेली मोठी घट आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याने पेटवलेला कांदा या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना बावनकुळे यांनी ‘सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक आहे,’ असे स्पष्ट केले.
बावनकुळे म्हणाले, कांदा बांगलादेश आणि इतर देशांत जात होता, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यावर मोठ्या प्रमाणात बंधनं आली आहेत. त्यामुळे देशातील कांद्याचा दर खाली पडलेला आहे. राज्यात अत्यंत वाईट परिस्थिती आहे.
सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल काळजी घेण्याचा विचार करतंय. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सकारात्मक चर्चा करत आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि माझे यावर लक्ष आहे. त्यावर आम्ही तोडगा काढू, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
देशातील पैसा विदेशात जाऊ नये; म्हणून...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन म्हणजे देशाला स्वदेशीकडे झुकवायचे आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, सोने विदेशातून आणावे लागते, त्यामुळे देशातील पैसा विदेशात जाऊ नये. युद्धामुळे महागाई आणि इतर खर्च वाढला आहे, त्याचा फटका आपल्या देशाला बसू नये; म्हणून हे आवाहन आहे. जनतेने हे आवाहन सकारात्मक पद्धतीने घेऊन स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला केली आहे.
ते म्हणाले, राज्यातील जलजीवनच्या कामाला पंधरा हजार कोटींचा निधी लागणार आहे, त्याबाबत हुडकोचा एक प्रस्ताव आहे. त्यातून मार्ग निघेल. विकास लवांडे यांच्यावरील शाईफेक प्रकरणाचा पोलिस योग्य बाजूने तपास करत आहेत. येत्या काळात त्याचा योग्य तपास झालेला आपल्याला दिसेल.
सेंट्रल ओबीसीसाठी मी स्वतः फॉलोअप घेणार
सेंट्रल ओबीसीसाठी अनेक ठिकाणी क्वॉमा, स्वल्पविराम यामुळे 27 जातींना सेंट्रल ओबीसीतून वगळले आहे. याबाबत मी स्वतः फॉलोअप घेणार आहे. १२ बलुतेदार समाज राज्य सरकारची जबाबदारी आहे, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
खरातप्रकरणी कोणीही गडबड करू शकणार नाही
देवेंद्र फडणवीस आणि आमचं सरकार खरात प्रकरणाबाबत कुठेही टाचणीभरही चूक होऊ देणार नाही. आमची एसआयटी यावर चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं यावर रोज लक्ष आहे. कोणीही गडबड करू शकणार नाही, इतकी खबरदारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे, अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.