पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतदारसंख्येत मोठी घट झाली आहे.
या घटेमुळे आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार आहे.
महायुतीसाठी या मतदारसंघात विजय मिळवणे अधिक कठीण होण्याची शक्यता आहे.
Pune News : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंख्येत मोठी घट झाली असून त्याचा थेट राजकीय समीकरणांवर परिणाम होणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत पदवीधर मतदारसंघात तब्बल 1 ख १५ हजार मतदार कमी झाले असून, शिक्षक मतदारसंघातही २० हजारांहून अधिक घट झाली आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत महायुतीला या दोन्ही मतदारसंघांमध्ये विजय मिळवण्यास काहीशा अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२०२० च्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघात तब्बल ६२ इच्छुक रिंगणात उतरले होते, तर शिक्षक मतदारसंघातही डझनभर उमेदवार मैदानात होते. त्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघातून आमदार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातून आमदार जयंत आसगावकर यांनी विजय प्राप्त केला होता.
महायुतीचे उमेदवार दोन्ही जागांवर पराभूत झाले होते. यंदा मात्र महायुतीने या दोन्ही जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. मात्र यंदा सर्व पक्षांमधील इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली असून मतदार नोंदणीवरही परिणाम दिसून येत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी महायुतीकडून क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या नावाची चर्चा आहे. तर महाविकास आघाडीकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा इच्छुकांची संख्या कमी आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. त्यानुसार पुणे पदवीधर मतदारसंघात सध्या ३ लाख १० हजार ९६४ मतदार आहेत. जे २०२० मध्ये ४ लाख २६ हजार २५७ होते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७५ हजार ४९८ मतदारांची घट झाली असून कोल्हापूर जिल्ह्यात मात्र २ हजार १६७ मतदारांची वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील मतदारांमधील झालेली घट भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असून कोल्हापूरमधील झालेली मतदारांची वाढ महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता असल्याचे बोललं जात आहे.
शिक्षक मतदारसंघातही जवळपास असेच चित्र आहे. २०२० मध्ये ७२ हजार ५४५ इतकी असलेली मतदारसंख्येत आता घट होऊन ती ५१ हजार ९७९ वर आली आहे. पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत मतदारसंख्येत घट झाली आहे. मात्र सांगली जिल्ह्यात ५१० मतदारांची वाढ झाली आहे. सध्या मतदार नोंदणी सुरू असली तरी इच्छुकांची संख्या कमी पाहता मोठी वाढ होण्याची शक्यता फारच कमी आहे. यामुळेच याचा कोणाला फटका बसणार याची राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे.
दरम्यान आमदारांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने डिसेंबर २०२६ मध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी काटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
1. मतदारसंख्येत घट का झाली आहे?
नोंदणी, स्थलांतर किंवा अद्ययावत प्रक्रियेतील बदलांमुळे घट झाली असू शकते.
2. कोणत्या मतदारसंघांवर परिणाम झाला आहे?
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांवर परिणाम झाला आहे.
3. किती मतदार कमी झाले आहेत?
पदवीधर मतदारसंघात सुमारे 1 लाख 15 हजार आणि शिक्षक मतदारसंघात 20 हजारांहून अधिक मतदार कमी झाले आहेत.
4. याचा राजकारणावर काय परिणाम होईल?
निवडणुकीतील समीकरणे बदलू शकतात आणि निकालावर परिणाम होऊ शकतो.
5. कोणत्या पक्षाला फटका बसू शकतो?
महायुतीला अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.