Ahmednagar ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar ZP : नगर जिल्हा परिषदेत पुन्हा गट, गण रचना व आरक्षण सोडती

राज्य सरकारच्या निर्णयामुळे नुकतीच तयार केलेली गट, गण रचना व आरक्षण सोडतीही रद्द झाल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

Ahmednagar ZP : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांत 50 ते 75 सदस्य असावे असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 14 पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम पुन्हा पहिल्यापासून सुरू करावा लागणार आहे. नुकतीच तयार केलेली गट, गण रचना व आरक्षण सोडतीही रद्द झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हात प्रशासकीय कामकाजाचा ताण वाढला असला तरी आरक्षणामुळे घरी बसण्याची वेळ येऊ शकणाऱ्या नेत्यांना नवा आशेचा किरण दिसला आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेतील सदस्यांची मुदत मार्च अखेरीला संपली होती. त्या जागी प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशानुसार 85 जिल्हा परिषद गट व 170 पंचायत समिती गणांची रचना तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनावर सोपविले होते. त्यानुसार गट व गण रचनेचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. नव्याने तयार करण्यात आलेल्या गट व गणांची आरक्षण सोडत 28 जुलैला काढण्यात आली.

गट व गणांच्या आरक्षण सोडतीवर सुमारे 70 जणांनी आक्षेप नोंदविले होते. या आरक्षण सोडतीमुळे जिल्हा परिषदेतील दिग्गज नेते अण्णासाहेब शेलार, राजेश परजणे, सुनील गडाख, प्रताप शेळके, सुनीता भांगरे, अशोक भांगरे, कैलास वाकचौरे, सीताराम राऊत आदी नेत्यांना घरी बसण्याची वेळ आली होती. मात्र राज्य सरकारच्या नव्या आदेशामुळे या नेत्यांना आशेचा नवा किरण दिसला आहे.

नवी गट-गण रचना अधिक सोयीस्कर

पूर्वीच्या जिल्हा परिषदेत 73 सदस्य होते. नव्या निर्णयानुसार केवळ दोन सदस्य वाढू शकतात. त्यामुळे जुन्या गट-गण रचनेत किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडतही पुन्हा होणार असल्याने दिग्गज राजकीय नेत्यांना पुन्हा जिल्हा परिषदेत जाण्याची संधी मिळण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT