सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharne) हे राज्यमंत्री होते; पण सोलापूरवर (Solapur) आलेल्या कोरोना महामारीत ते सातत्याने धडपडत होते. आताचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) प्रचंड अनुभवी अन् राज्याच्या मंत्रिमंडळातील तीन नंबरचे दिग्गज मंत्री आहेत. सोलापूरवर आलेल्या लम्पीच्या संकटात ते सध्या कुठेही दिसत नाहीत. मुक्या प्राण्यांच्या बोलक्या वेदना ना प्रशासनाला दिसत आहे ना पालकमंत्र्यांना दिसत आहेत. कोरोनात तेव्हाचे पालकमंत्री सातत्याने दिसत होते. लम्पीने निम्मा जिल्हा पोखरुन काढलाय, तरीही विद्यमान पालकमंत्री कुठे हरवले आहेत? याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. (Guardian Minister Dattatrey Bharne was remembered by citizens of Solapur)
महसूलसारखे वजनदार खाते आणि सोबत पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी विखे-पाटील यांच्यावर आहे. पालकमंत्री आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री म्हणून विखे-पाटील सोलापूरच्या लम्पीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ते दोनवेळा सोलापूरच्या दौऱ्यावर आले. एका दौऱ्यात भरमसाठ बैठका आणि दुसऱ्या दौऱ्यात माळशिरसचा कोपरा त्यांनी कव्हर केला. सोलापूरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आतापर्यंत केलेली एवढीच कामगिरी समोर येत आहे. माणसांवर आलेल्या कोरोना महामारीत ज्या पध्दतीने जिल्हा प्रशासन सतर्क होते, त्या पध्दतीने जनावरांवर आलेल्या लम्पीच्या साथीत प्रशासन सतर्क दिसत नाही. कोरोना महामारीत लढण्याचा अनुभव असलेल्या प्रशासनाला लम्पीचे गांभीर्य वाटत नाही का?, पालकमंत्र्यांचा पाठपुरावा नसल्याने लम्पी हाताबाहेर जात आहे का? याचे उत्तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विचारण्याची आवश्यकता आहे.
सोलापूर जिल्ह्यावर आलेल्या अतिवृष्टी व महापुराच्या संकटातही पालकमंत्री विखे-पाटील कुठेच दिसले नाहीत. पालकमंत्री नसतानाही जिल्हा प्रशासन त्यांच्या पध्दतीने काम करत आहे. या कामाला अधिक गती देण्यासाठी पालकमंत्र्यांचे सातत्याने लक्ष असणे आवश्यकच आहे. सोलापूरच्या विमानसेवेला तत्कालिन पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी प्राधान्य देत बोरामणी विमानतळासाठी पाठपुरावा व प्रयत्न केले. राज्याच्या अर्थसंकल्पात बोरामणी विमानतळासाठी आर्थिक तरतुद करण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे.
आताचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बोरामणीच्या विमानतळासाठी भरबैठकीत माळढोकची चेष्टा केली. होटगी रोडवरील विमानतळावर स्पष्टपणे बोलण्याचे त्यांनी टाळले. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने बदली पालकमंत्री देऊन वेळ मारुन नेली आहे; परंतु सोलापूरच्या विकासासाठी स्थानिक पालकमंत्री कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही शिंदे-फडणवीस सरकारने दिले नाही.
अधिवेशनापूर्वी होणार विस्तार
आगोदर पितृ पंधरवडा नंतर दसरा, त्यानंतर दिवाळी असे मुहुर्त शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रीमंडळ विस्तारासाठी देण्यात आले होते. विस्ताराला आता नवा मुहूर्त मिळाल्याची कुजबुज सुरू झाली आहे. विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल यावर इच्छुक व त्यांचे समर्थक समाधान मानत आहेत. सोलापूर जिल्ह्यात दोन प्लस एक आमदार असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस असो की सहा प्लस एक आमदार असलेली भाजप, सोलापूर जिल्ह्याला हक्काचा स्थानिक पालकमंत्री का देत नाही?, याचा सोलापूरकर म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे.
माळशिरस-करमाळा बनले लम्पीचे हॉटस्पॉट
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार संजय शिंदे यांचे अनुक्रमे माळशिरस आणि करमाळा हे दोन तालुके सध्या लम्पीचा हॉटस्पॉट झाले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या मतदार संघात लम्पीने घातलेला धुमाकूळ रोखण्यासाठी वेळीच ठोस प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यासाठी हे दोन्ही किती पुढाकार घेतात? यावर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील लम्पीच्या उपाययोजना अवलंबून आहेत. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांबद्दल बैठकांमध्ये धाडसाने बोलणारे माळशिरसचे आमदार राम सातपुते लम्पीच्या विषयात अधिकाऱ्यांना का धारेवर धरत नाहीत? याचे कोडे मात्र अनेकांना उलगडलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.