Jaykumar Gore-Ranjitshinh Naik Nimbalkar-Rajendra Raut-Ram satpute Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore Solapur Tour : पालकमंत्री गोरेंच्या दौऱ्यात मोहिते पाटील विरोधकांना मानाचे पान; निंबाळकर, सातपुते, राऊतांना मिळणार बळ!

Solapur political News : माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी होते. निंबाळकर आणि सातपुते यांची मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक अशी ओळख आहे, त्यामुळे गोरे यांच्या कामकाजाची चुणूकही पहिल्याच दौऱ्यात दिसून आली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 24 January : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पहिलाच सोलापूर दौरा वेगवेगळ्या कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. माळशिरसमधील नातेपुतेपासून सुरू झालेला दौरा सोलापूर शहरातील नियोजन आढावा बैठकीपर्यंत वेगवेगळ्या घडामोडी पालकमंत्र्यांच्या दौऱ्यातून पहायला मिळाल्या. विशेष म्हणजे गोरे यांच्यासोबत माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत या मोहिते पाटील विरोधक माजी लोकप्रतिनिधींनाही विद्यमान लोकप्रतिनिधीइतकाच मानसन्मान मिळाला. या संपूर्ण दौऱ्यात भाजपचे सर्व आमदार पहायला मिळाले. मात्र, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची अनुपस्थिती मात्र जाणवली.

पालकमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी गुरुवारी (ता. २३ जानेवारी) प्रथमच सोलापूरचा दौरा केला. सोलापूर आणि सातारा हद्दीवर असणारे शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन गोरेंनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. नातेपुते येथे प्रचंड जल्लोषात गोरे यांचे स्वागत करण्यात आले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पुढे राम सातपुते यांच्या निवासस्थानी भेट देऊन गोरे हे पंढरपूरला आले.

पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेऊन गोरे यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाड्यावर दुपारचे भोजन घेतले. गोरे यांना सोलापूरमध्ये (Solapur) पोचेपर्यंत सायंकाळचे साडेपाच वाजले होते. सोलापूर शहरात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी गोरे यांचे स्वागत केले. स्वागतानंतर देशमुख हे परत निघाले होते. मात्र, गोरेंनी आग्रह करून देशमुखांना गाडीत बसवलेच.

नियोजन भवनात आल्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार नारायण पाटील, आमदार राजू खरे यांनी गोरे यांचे स्वागत केले. स्वागतानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार खरे आणि पाटील हे निघून गेले. त्याचवेळी त्यांनी पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे कुठे आहेत, अशी विचारणा केली. आवताडे यांचे आगमन झाले. मात्र, माजी आमदार असल्यामुळे राजेंद्र राऊत परत जायला निघाले होते. तेव्हा त्यांनाही तुम्ही कुठे निघालात, अशी विचारणा गोरेंनी केली.

मा सध्या आमदार नाही. शासकीय बैठकीत माझे काय काम, असे सांगून राऊत हे परत जायला निघाले, तेवढ्यात पालकमंत्री गोरे यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना नियोजन भवनात घेऊन गेले. गोरे यांनी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबरच माजी लोकप्रतिनिधींनाही तेवढाच मानसन्मान दिल्याचे पहिल्याच दौऱ्यात दिसून आले.

विशेषतः माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते. निंबाळकर आणि सातपुते यांची मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक अशी ओळख आहे, त्यामुळे गोरे यांच्या कामकाजाची चुणूकही पहिल्याच दौऱ्यात दिसून आली. विशेषतः विद्यमान लोकप्रतिनिधींबरोबरच माजींनाही पालकमंत्री गोरे यांनी मानाचे पान दिल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT