Uday Samant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti Dispute : ‘पालकमंत्री कोणाचाही असला तरी महायुतीत मिठाचा खडा कोणी टाकू नये’

Uday Samant Statement : महायुतीत समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे सांगत उदय सामंत यांनी मित्रपक्षांना डावलल्यास कटुता वाढू शकते, असा इशारा दिला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 28 May : पालकमंत्री कोणाचा जरी असला तरी त्यांनी इतर दोन्ही पक्षांमधील नेत्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. महायुतीमध्ये कटूता येईल, अशा प्रकारचा मिठाचा खडा कोणी टाकू नये. आमचा पण मतदानामध्ये वाटा आहे. आपण सर्वांनी जर समन्वयाने काम केले, तर चांगली निवडणूक होऊ शकते. पण मित्रपक्षांना डावलून काम केलं तर मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कटुता राहते, अशी भूमिका उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मांडली.

उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे गेली दोन दिवस शिवसेना संघटना वाढीच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शिवसेना पक्षाच्या बैठकीत बहुतांश नेत्यांनी पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, महायुतीत सामील असूनही सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर बोलताना उद्योग मंत्री सामंत यांनी हे भाष्य केले.

ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि माझी भेट महिन्यापूर्वी झाली होती. त्यानंतर प्रसाद लाड त्यांना भेटायला गेले. मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्यापासूनची महायुतीची आहे. मनोज जरांगेंच्या काही शंका असतील सरकार म्हणून आम्ही त्या दूर करू. प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत जाऊन सविस्तर चर्चा केली आहे.

प्रसाद लाड यांचा काल मला फोन आला होता. मराठा आरक्षणासंदर्भात विखे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासंदर्भात ते बोलले. जरांगे पाटील यांना आंदोलनाची वेळ येणार नाही, त्याप्रमाणे सरकार काम करेल. अशी भूमिका प्रसाद लाड यांनी मांडली. राज्य सरकारची भूमिकही मराठा समाजाबाबतीत सकारात्मक आहे. तीच घेऊन पुढे जात आहोत, असेही सामंत यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, आम्ही सरकारमध्ये सांघिक पद्धतीने काम करत आहोत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती म्हणून काम करत होतो. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एकत्रित येऊन निर्णय घेत आहोत. त्यातूनच मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावणार आहोत.

शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीसंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यातील कोअर कमिटीच्या सदस्यांसोबत बैठक झाली. येत्या पाच जून रोजी खासदार धैर्यशील माने यांनी मुलाखती ठेवल्या आहेत.

विधान परिषदेचे निवडणूक तोंडावर आहे. सोलापूर जिल्ह्यात आमचे 110 सदस्य आहेत. यासंदर्भात आमची कोअर कमिटीची बैठक झाली आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहोत. महायुतीत समन्वय असणे आवश्यक आहे.

लोकशाहीमध्ये कोणीही अर्ज खरेदी करू शकतो. शिवसेनेची भूमिका महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याची आहे. सोलापुरात आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी अर्ज घेतला असेल आणि जर एकनाथ शिंदे यांनी महायुतीची घोषणा केली तर त्या कार्यकर्त्याला कसं समजायचं ते आमच्यावर सोडून द्या, असा शब्दही सामंत यांनी जाहीरपणे दिला.

कोअर कमिटीच्या बैठकीत विधान परिषद निवडणुकीबाबत नव्हे तर संघटना वाढवताना ज्या अडचणी येत आहेत, त्यावर चर्चा झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना मी विनंती करणार आहे की, सर्वांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे.

मी आणि दादा भुसे यांनी कोअर कमिटीत आमची भूमिका मांडली आहे. आमच्या ज्या विद्यमान जागा आहेत. त्या सोडून आम्ही एक दोन जास्त जागा मागितल्या आहेत. मात्र त्याबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीवरून येतील आणि एक दोन दिवसांत फॉर्म्युला ठरेल. महायुती म्हणून आम्ही 17 जागा लढू आणि त्या जिंकूही, असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

हितेंद्र ठाकूरच्या भेटीबाबत नावीन्य काय?

हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीबाबत सामंत म्हणाले, परवा आमचे माजी आमदार रवींद्र फाटक आणि आज खासदार श्रीकांत शिंदे हे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना भेटले, यात नावीन्यपूर्ण काय आहे. आमच्या कोणत्याही नेत्याने बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होतेय, असे म्हटलेलं नाही.

शिवसेना-राष्ट्रवादीत कोणताही वाद नाही

हितेंद्र ठाकूर यांच्याबद्दल आम्हाला नितांत आधार आहे. विधान परिषदेच्या जागेवरून रवींद्र फाटक भेटले असतील. तो लोकशाहीचा एक भाग आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कुठ वाद दिसतो, हे आम्हाला अजून कळलेलं नाही. सर्व निर्णय एकनाथ शिंदे घेतात, असेही ते म्हणाले. सोलापूर एमआयडीसीबाबत मी आता बोलणार नाही, सध्या आचारसंहिता सुरू आहे. मात्र 15 ते 20 दिवसांनंतर सोलापूर एमआयडीसीसंदर्भातील सर्व प्रश्न सोडवले जातील, असा शब्दही उदय सामंत यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT