

Bhandara, 28 May : भारतीय जनता पक्ष विधान परिषदेची उमेदवारी देणार असेल तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून कमळ हाती घेण्यास तयार आहे, असे खळबळजनक विधान खासदार प्रफुल पटेल यांचे भंडारा-गोंदियामधील खंदे समर्थक सुनील फुंडे यांनी केले आहे. अंतर्गत वादामुळे चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीला विधान परिषद निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसह विधान परिषदेच्या १७ जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्या जागांवर संधी मिळावी, यासाठी राज्यभरातील महायुतीच्या अनेक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राज्यात बहुतांश महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांमध्ये महायुतीचे बहुमत आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी महायुतीत बाहुगर्दी आहे.
जागा वाटपावरून सध्या महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप सर्वाधिक १२ जागा लढविण्यावर ठाम आहे. शिवसेनेला तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा देणार असल्याची चर्चा आहे. मात्र, शिवसेना सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेस तीन जागांवर ठाम असल्याने महायुतीत जागा वाटप रखडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून भंडारा गोंदियाची जागा खासदार प्रफुल पटेल यांचे कट्टर समर्थक आणि सहकार क्षेत्रातील जुन नेते सुनील फुंडे यांच्यासाठी मागण्यात येत आहे. मात्र, भाजपकडून या जागेवर दावा करण्यात आलेला असून ही जागा मित्रपक्षाला सोडणार नसल्याचे स्थानिक भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल पटेल यांच्या नावापुढे कार्याध्यक्ष हे लावलेले नाही, त्यामुळे पटेल अगोदरच पक्षात नाराज आहेत. त्यातच समर्थकासाठी जागा सुटत नसल्याने पटेल यांच्यासह कार्यकर्तेही नाराज झालेले आहेत, त्यातूनच फुंडे यांनी भाजप प्रवेशाची तयारी दाखवली आहे.
भंडारा गोंदिया मतदारसंघात महायुतीचे संख्याबळ सर्वाधिक आहे. मी सध्या इच्छुक आहे. लोकसभेला भाजपला लढली. विधानसभेला भाजपचा उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढला. मतदारांचा कौल पाहून विधान परिषदेला मला संधी मिळावी, अशी अपेक्षा मी प्रफुल पटेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे.
मतदाररांची पसंती नसेल तर मला उमेदवारी देऊ नये, त्यासाठी गृह विभागाकडून सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणीही सुनील फुंडे यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे काही मतदारांनी माझ्याशी संपर्क केला आहे, ते मला भेटण्यासाठी इच्छूक आहेत.
आमचे नेते प्रफुल पटेल यांच्याशी चर्चा करून मी जर-तरचे राजकारण संपवून टाकेन. विधान परिषदची उमेदवारी भारतीय जनता पक्ष मला देणार असेल तर मी त्या पक्षात प्रवेश करण्यासाठी तयार आहे, असे विधानही फुंडे यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.