Gokul Dudh Sangh, Satej Patil, Shaumika Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Gokul Dudh Sangh: ठेक्यावरून 'गोकुळ'चे राजकारण पेटले; शौमिका महाडिक अन् सत्ताधारी एकमेकांसमोर ठाकले

संभाजी थोरात

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या गोकुळ दूध संघात 'पॅकेजिंग' ठेक्यावरून वाद पेटला आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादामुळे गोकुळचा 'कारभार' पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. (Latest Political News)

गोकुळ दूध संघाची आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा दूध संघ अशी ओळख असून संघात हजारो कोटींची उलाढाल होते. कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण या दूध संघाभोवती फिरते. 'गोकुळ'चा संचालक होण्यासाठी अनेक नेते धडपडताना दिसतात. गोकुळ मध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता होती. ही सत्ता उलथवून माजी मंत्री सतेज पाटील आणि सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकूळ संघ ताब्यात घेतला.

यावेळी महादेवराव महाडिक यांच्या सून शौमिका महाडिक या संचालिका म्हणून निवडून आल्या. गेल्या तीन वर्षापासून त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात खिंड लढवत आहेत. सध्या गोकुळ दूध संघाच्या पुण्यातील पॅकेजिंग केंद्रावरून वाद सुरू आहे. या अगोदर महाडिक यांची सत्ता असताना हे पॅकेजिंग केंद्र त्यांचे जावई विजय ढेरे यांच्या कंपनीकडे होते. मात्र सत्ता बदलल्यानंतर ते काढून घेण्यात आले. त्यानंतर न्यायालयीन वाद सुरू झाला.

याबाबत शौमिका महाडिक यांनी सांगितले,"न्यायालयाने विजय ढेरे यांच्या गायत्री कोल्ड स्टोरेजला ठेके द्यावा असे आदेश दिले असूनही त्यांना ठेका दिला जात नाही. गायत्री कोल्ड स्टोरेज ऐवजी कोल्हापूरमधील एका बड्या नेत्याची गुंतवणूक असलेल्या अनंत डेअरीला हा ठेका दिला जात आहे. गोकुळचे वितरक नाराज असल्याने माझ्या प्रश्नांना माजी मंत्री सतेज पाटील यांनी उत्तर द्यावीत.", असे आवाहनही शौमिका महाडिक यांनी केले आहे.

यावर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, "महाडिक यांचे जावई विजय ढेरे यांचा ठेका काढल्याने शौमिका महाडिक आरोप करत आहेत. मात्र मांजरी बुद्रुक येथे जाताना गोकुळ दूध संघाच्या गाड्यांना वेळ लागत आहे. त्यामुळे संघाचा खर्चही वाढत आहे. त्यामुळे अनंत डेअरीला पॅकेजिंगचा ठेका दिला आहे.महाडिक यांचे दूध वाहतूक करणारे ४५ टँकर बंद केल्याने त्या संतप्त झाल्या आहेत", असाही आरोप डोंगळे यांनी केला आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांमधील सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे हा वाद आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. या वादाचा परिणाम न्यायालयीन कामकाजावर होऊन हा लढा लांबत जाणार असल्याचे चित्र निर्णाण झाले आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे गोकुळ दूध संघातील राजकारण आर्थिक बाबींभोवतीच फिरते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT