H. K. Patil
H. K. Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

एच. के. पाटील म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार मनमानी करणारे...

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - शिर्डी येथे काँग्रेसचे दोन दिवसीय नवसंकल्प शिबिर झाले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ( H. K. Patil said that the BJP government at the center is arbitrary ... )

एच. के. पाटील म्हणाले, केंद्रातील भाजपचे सरकार मनमानी, अत्याचारी असून विरोधकांनाही संपवण्याचे काम करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना भीती दाखविली जात आहे. उदयपूर शिबिरामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य व उत्साह वाढला असल्याने भाजपाने धास्ती घेतली आहे. म्हणूनच सोनिया गांधी, राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडवण्यासाठी ईडीची नोटीस पाठवली आहे परंतु अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भिक घालत नाही, असा इशारा एच. के. पाटील यांनी दिला आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, काँग्रेसच्या विचारातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. ज्या देशांमध्ये सुई बनत नव्हती त्या देशात रॉकेटची निर्मिती होऊ लागली. भारत महासत्ता बनण्याचे काम काँग्रेसने केले. मात्र धर्माचे बाजारीकरण करून देशामध्ये तेढ निर्माण करणारा भाजप हा धर्म भ्रष्ट करत आहे. सध्या भाजप सरकार हे दररोज देशाची मालमत्ता दोन उद्योगपतींना विकत आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या सन्मान मोदी सरकारने कमी केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकार सातत्याने खोटे बोलत असून दररोज देशातील विविध सार्वजनिक उपक्रम विक्रीला काढत आहेत. देशात फक्त दोनच भांडवलदार मोठे होत आहेत. भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला सन्मान कमी करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले असून देशाची लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचे भारत जोडो अभियान हाती घेतली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, देशात महागाई भयंकर वाढली आहे. पेट्रोल-डिझेल गॅसचे दर वाढलेले आहेत. बेरोजगारीची भीषण समस्या आहे. या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी भाजपाकडून जातीयतेची राजकारण केले जात आहे. दररोज नवनवीन विषय काढून बनवाबनवी केली जात आहे. मात्र या सर्वांना काँग्रेस भारत जोडो अभियानातून उत्तर देणार आहे. इंदिराजींच्या देहाची चाळण झाली त्यामुळे त्यांचा मृतदेह मांडीवर घेणाऱ्या सोनिया गांधी, त्यांचे पती राजीव गांधी यांच्या देहाच्या चिंधड्या झाल्या. त्यावेळी देशाला सावरणाऱ्या सोनिया गांधी. देशासाठी त्याग केलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या परिवाराचा छळ करण्याचे काम भाजप करत आहे. मात्र त्याला जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नष्ट होतात की काय असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. केंद्र सरकार अपयशी ठरले असून हे अपयश झाकण्यासाठी ते धार्मिक प्रश्न उपस्थित करत आहेत .ज्ञानवापी , हनुमान चालीसा या प्रश्नांपेक्षा बेरोजगारीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत .या शिबिरात इव्हीएम आम्हाला नको असून मतपत्रिका द्या असे सांगताना भारत जोडो अभियानातून काँग्रेस अधिक बळकट होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संजय बालगुडे यांनी संपादित केलेल्या वाढत्या महागाई वरील महागाईचे गॅस कॅलेंडर या विशेष पुस्तिकेचे अनावरण व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सा. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुवा, संपतकुमार, सोनल पटेल, कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीष चौधरी. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT