Kolhapur Political News : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत महायुतीतील अनेक दिग्गजांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांचाही समावेश आहे. या पराभवानंतर आता हसन मुश्रीफ यांनी मौन सोडले असून, नविद यांचा पराभव हा ठरवून केलेला कट असल्याचे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा अखेर निकाल लागला. या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने महायुतीचा पराभव केला. या निवडणुकीत १३-१२ अशी आघाडी घेत समविचारी आघाडीने विजय मिळवला. मात्र, या निकालात संघाच्या माजी अध्यक्षांसह मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
या पराभवानंतर महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. हसन मुश्रीफ यांनीही दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी दिलेला निकाल स्वीकारत असल्याचे स्पष्ट केले होते. कदाचित आमच्यात शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणे लोकांना आवडली नसावीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
तसेच, मुश्रीफ यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत गोकुळ दूध संघाचे नवीन संचालक मंडळ जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख शेतकरी कुटुंबांचे कल्याण साधेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. संघाच्या उत्कर्षासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली होती. मात्र, मुलगा नविद यांच्या पराभवाबाबत त्यांनी त्यावेळी भाष्य केले नव्हते.
मुश्रीफ काय म्हणाले?
आता हसन मुश्रीफ यांनी मुलाच्या पराभवाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आजरा येथील संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. गोकुळच्या निवडणुकीत आपला पराभव झाला असला, तरी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये किंवा निराश होऊ नये. उद्यापासून पुन्हा एकदा कामाला लागूया आणि झालेल्या चुका सुधारूया, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
“आता जे झालं ते इथेच सोडून द्यायचं. जीवनामध्ये असं घडत असतं. कधी कधी अशी ठेच लागणंही बरं असतं. माणूस थोडा जमिनीवर येतो. याआधी आपण अनेक विजय पाहिले आहेत. आता हा पराभव आपल्या वाट्याला आला आहे. याची जाणीव आपल्यासह मलाही आहे,” असे ते म्हणाले. तसेच, पराभवाबाबत आत्मचिंतन बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे. आत्मचिंतन करून पुढील रणनीती ठरवू, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
‘ठरवून केलेलं षडयंत्र’
याचवेळी हसन मुश्रीफ यांनी मुलगा नविद मुश्रीफ यांच्या पराभवाबाबत गंभीर आरोप केला. नविद यांचा पराभव हा ठरवून केलेला कट असल्याचे विधान त्यांनी केले. मतदान केंद्रांवरील आकडेवारी पाहिल्यास हा प्रकार ठरवून केल्याचे लक्षात येईल, असे ते म्हणाले. या पराभवामुळे खचून न जाता झालेल्या चुका सुधारून पुन्हा कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
महायुतीतील अंतर्गत राजकारणाची चर्चा
हसन मुश्रीफ यांच्या या वक्तव्यामुळे कागलमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. नविद मुश्रीफ यांच्या पराभवामागे महायुतीतील अंतर्गत राजकारण कारणीभूत ठरले का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुश्रीफ यांच्या षडयंत्राच्या आरोपामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.