Hasan Mushrif on Kolhapur Flood Situation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif News : कोल्हापूरातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुश्रीफांकडून सर्व विभागांना अलर्ट राहण्याच्या सूचना!

Rahul Gadkar

Hasan Mushrif Meeting News : कोल्हापूरात 2019 आणि 2021 साली आलेल्या पुरस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करुन निवारागृहात स्थलांतरीत केलेल्या व्यक्ती आणि जनावरांना आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

पालकमंत्री मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांच्यासमवेत जिल्हा प्रशासनाचा ऑनलाईन स्वरुपात पुरस्थितीच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध नद्यांच्या पाणीपातळी, धरणसाठा, स्थलांतरीत संख्या तसेच राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली.

या बैठकीत खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व संबंधित यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पुरस्थितीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातून 1.90 लाख क्युसेक विसर्ग होतो. तसेच यात कृष्णा नदीचाही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 3 लक्ष क्यूसेक पाणी विसर्ग सुरू होणार आहे,असे सांगितले.

यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 3 लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी विसर्ग अलमट्टीतून व्हावा, यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हयात ज्या ठिकाणी 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे अशा ठिकाणी तातडीने पंचनामे करा. सर्व तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी यांच्यापासून वरिष्ठ पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी अलर्ट मोडवर राहून कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

घरांची पडझड, इतर नुकसान तसेच शेतीचे नुकसान याबाबत पंचनामे त्या त्या वेळी करणे सुरु असून एका महिन्यात भरपाई देण्याचे नियोजनही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी सांगितले. सध्या पंचगंगा व इतर नद्याही धोका पातळीवर वाहत आहेत. दिवसापेक्षा रात्रीचा पाऊस धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामूळे नदीकाठची गावे आणि विशेषत: कोल्हापूर महानगरपालिकेने जास्त सतर्कता बाळगावी, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्हयातील खासदार व आमदार यांनी आपापल्या भागातील गावांमधे पुरस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती व येणाऱ्या अडचणी प्रशासनाला सांगितल्या. सार्वजनिक बांधकाम तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्यांवरील धोकादायक खड्डे तसेच साठलेले पाणी याबाबत दुरूस्त्या कराव्यात. पडणारी झाडे वेळेत काढावीत व वाहतूक सुरु करावी याबाबतही सूचना त्यांनी दिल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT