Kolhapur ZP Election Result : गत निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस हा कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्तेतला पक्ष होता. पण यंदाच्या निवडणुकीत जागा वाटपात भाजप सांगेल तेच राष्ट्रवादी काँग्रेसला ऐकावे लागले, हीच परिस्थिती इचलकरंजी महानगरपालिकेत पाहायला मिळाली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ बॅकफूटवर राहून शिवसेना आणि भाजपला सहन करत राहिले. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा काटा काढला.
गेल्यावेळी 14 जागा मिळवलेल्या भाजपला यंदा 12 जागांवर विजय मिळवता आला. जिंकून येणाऱ्या जागांवर बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांना तडाखा दिल्याने ग्रामीण भागात भाजपची पुन्हा पीछेहाट झाली आहे. महापालिका आणि नगरपरिषदेत चांगले यश मिळवलेल्या भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. जिल्ह्याच्या 2 तालुक्यांत एकही जागा घेता आली नाही, तर 2 तालुक्यांत उमेदवार उभे करण्याची संधी मिळाली नाही.
भाजपच्या अपयशाची सुरुवात जागा वाटपापासूनच सुरू झाली. जनसुराज्य, शिवसेना यांच्याकडून सन्मानजनक जागा घेण्यात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना राधानगरी, भुदरगड या तालुक्यात निवडणूक लढवण्याची संधीच मिळाली नाही.
चंदगडमध्ये भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांच्या रुपात असणारा भाजपचा वारू काँग्रेस-राष्ट्रवादीने रोखला. त्यांना या तालुक्यात फक्त 1 जागा मिळाली. शिरोळमध्येही अशीच परिस्थिती झाली. पन्हाळा आणि शाहूवाडी मतदारसंघात भाजपला जनसुराज्यचा दबाव झुगारून संघटन अधिक मजबूत करण्याची आणि मतांचा टक्का वाढवण्याची गरज आहे.
दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार अमल महाडिक यांनी 3 जागा जिंकल्या. करवीरमध्येही भाजपला पहिल्यांदाच 3 जागा मिळाल्या. कागलमध्ये दोन घाटगे गट एकत्र आल्याने येथे 4 जागांवर भाजपला लाभ झाला. या भाजपच्या जमेच्या बाजू असल्या तरी पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले राधानगरी, भुदरगड, गगनबावडा या तालुक्यांमध्ये भाजप नेत्यांना भविष्यात बरीच मेहनत करावी लागणार आहे.
ग्रामीण भागात भाजपाचा विस्तार वाढताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात नियोजन समिती, विविध महामंडळे, समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी देणे आवश्यक आहे. ज्या तालुक्यांमध्ये भाजपला एकही जागा नाही, तेथे कार्यकर्त्यांना निधीच्या रूपाने बळ देण्याची गरज आहे. भाजप नेत्यांनी मित्रपक्षांना बरोबर घेताना आपल्या कार्यकर्त्यांनाही संधीची गरज आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीची आवश्यकता असून नेतृत्वाची आणि सत्तेचा लाभ मिळण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. ती वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.