Kolhapur News : राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDA मध्ये सहभागी होणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. लोकसभेतील मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांच्या पार्श्वभूमीवर भाजपलाही विरोधकांचे संख्याबळ कमी करण्याऐवजी पाठिंबा वाढवण्यात रस असल्याची चर्चा आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासह शरद पवार गटाच्या NDA मधील संभाव्य प्रवेशावर महत्त्वाचे भाष्य केले आहे.
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकांच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस NDA ला पाठिंबा देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
याबाबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, "गेल्या चार-पाच दिवसांपासून आम्ही आमच्या मतदारसंघात होतो. काल लग्नानिमित्त पुण्यात आलो होतो. मात्र, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यावेळी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार होते, त्यावेळी अजितदादा हयात होते. मात्र, दादांच्या अकाली निधनामुळे ही प्रक्रिया थांबली."
ते पुढे म्हणाले की, आता मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) निमित्ताने विलीनीकरणाची चर्चा पुन्हा पुढे आली असली, तरी आमच्या पक्षाने सर्वप्रथम हे विलीनीकरण होणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांच्या गटानेही अशीच भूमिका घेतली होती. आता मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर शरद पवार यांचा गट NDA ला पाठिंबा देणार असेल, तर ते NDA चा भाग होऊ शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे, हे मुंबईला गेल्यानंतरच समजेल, असे सूचक विधानही मुश्रीफ यांनी केले.
आनंदराज आंबेडकरांच्या विधानावरही मुश्रीफ संतापले
दरम्यान, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी दिवंगत अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एखाद्या दिवंगत नेत्याबद्दल अशा प्रकारचे विधान करणे आणि विनाकारण वाद निर्माण करणे हे रिपब्लिकन चळवळीतील नेत्यालाही शोभणारे नाही, असे मुश्रीफ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते या वक्तव्याचा जाहीर निषेध करत असल्याचेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा आणि दुसरीकडे NDA मधील संभाव्य राजकीय समीकरणे यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.